पालघरमध्ये ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा; साधनांअभावी विद्यार्थी शिक्षणापासून दूर...

भगवान खैरनार
Thursday, 30 July 2020

 • कोरोना संकटामुळे राज्यातील शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळांनी ऑनलाईन शिक्षणावर दिला आहे. तसेच दूरचित्र वाहिनीवरही शिक्षण वर्ग सुरू केले आहेत; मात्र पालघर जिल्ह्यातील आदिवासीबहुल तालुक्‍यांमध्ये हे शिक्षण अजून पोहचलेच नाही.
 • इंटरनेटसह मोबाईल, टीव्ही आणि रेडिओच्या अभावामुळे ही परिस्थिती असून ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय रे भाऊ? असे म्हणण्याची वेळ येथील विद्यार्थ्यांवर आली आहे. विशेष म्हणजे शाळा बंद राहिल्यास शाळाबाह्य विद्यार्थीसंख्येत वाढ होण्याची भीती आहे. 

मोखाडा : कोरोना संकटामुळे राज्यातील शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळांनी ऑनलाईन शिक्षणावर दिला आहे. तसेच दूरचित्र वाहिनीवरही शिक्षण वर्ग सुरू केले आहेत; मात्र पालघर जिल्ह्यातील आदिवासीबहुल तालुक्‍यांमध्ये हे शिक्षण अजून पोहचलेच नाही. इंटरनेटसह मोबाईल, टीव्ही आणि रेडिओच्या अभावामुळे ही परिस्थिती असून ऑनलाईन शिक्षण म्हणजे काय रे भाऊ? असे म्हणण्याची वेळ येथील विद्यार्थ्यांवर आली आहे. विशेष म्हणजे शाळा बंद राहिल्यास शाळाबाह्य विद्यार्थीसंख्येत वाढ होण्याची भीती आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबईकर महिलांची प्रतिकार शक्ती पुरुषांपेक्षा जास्त, सिरो सर्व्हेचा निष्कर्ष...

सागरी, डोंगरी आणि नागरी अशा तीन विभागांत पालघर जिल्हा वसलेला आहे. स्वतंत्र आदिवासी जिल्हा म्हणून 1 ऑगस्ट 2014 रोजी या जिल्ह्याची निर्मिती झाली; मात्र सहा वर्षांच्या कालावधीनंतरही आदिवासी तालुक्‍यांमध्ये अजूनही आधुनिक शिक्षणासाठी इंटरनेट पोहचले नाही. बहुसंख्य घरात टीव्ही, रेडिओसुद्धा नाही. त्याचा मोठा फटका कोरोना संसर्गाच्या काळात या जिल्ह्याला बसला आहे. सरकारने शाळा सुरू करण्याऐवजी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला असल्याने आदिवासी तालुक्‍यांसह शहरी तालुक्‍यातील हजारो विद्यार्थी शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही ऑनलाईन शिक्षणापासून दूर आहेत. 

पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 2 हजार 131 शाळा असून त्यामध्ये 1 लाख 72 हजार 187 विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषदेने 1 हजार 198 शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीने शिक्षण वर्ग सुरू केल्याचे सांगितले आहे; तर 1 हजार 269 खासगी शाळांपैकी 927 शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याचे जिल्हा परिषदेची आकडेवारी सांगते. 

ही बातमी वाचली का? मुंबईकरांच्या जिवाशी सुरु आहे  खेळ ! लोकहो, तुम्ही घातलेला मास्क ओरिजनल आहे ना? एकदा चेक करा...

आकडेवारी फसवी 
अतिदुर्गम मोखाडा तालुक्‍यात 155 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यामध्ये 19 हजार 446 विद्यार्थी आहेत. यामध्ये 3 हजार 432 विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्ट फोन आहे. 2 हजार 590 विद्यार्थ्यांच्या घरी टीव्ही आहेत; तर 140 विद्यार्थ्यांच्या घरी रेडिओ असून 13 हजार 284 विद्यार्थ्यांकडे कुठलीही सुविधा नसल्याचे मोखाडा पंचायत समितीचे सर्वेक्षण आहे, अशी दारुण स्थिती असताना 155 पैकी 103 शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याची जिल्हा परिषदेची माहिती आहे; मात्र तालुक्‍यात 90 शाळांमध्येच ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी रघुनाथ पांढरे यांनी दिली. त्यामुळे शिक्षण विभागाची माहिती फसवी असून प्रशासनाचा समन्वय नसल्याचे समोर आले आहे. मुळातच आदिवासी भागातील बॅंकांचे व्यवहार नेटवर्क नसल्याने दोन-दोन दिवस बंद राहतात. त्यात जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील 60 टक्‍क्‍यांहून अधिक शाळा ऑनलाईन सुरू झाल्याचा दावा करत पाठ थोपटून घेतली आहे, असा आरोप होत आहे. 

ही बातमी वाचली का? एकच नंबर! दहावीच्या निकालात मुंबई पालिका शाळांचं दमदार कमबॅक

शाळाबाह्य विद्यार्थीसंख्या वाढणार 
शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनामुळे त्यांची भूक भागत होती. आता तेही बंद झाले आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सप्टेंबरनंतर आदिवासी भागातून स्थलांतर सुरू होईल. त्यात शाळांमधील विद्यार्थी स्थलांतरित होऊन विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भीती आहे. 

आदिवासी भागात मोबाईल टॉवर नाहीत. जिल्ह्यातील 90 टक्के लोक गरीब आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके पाठवून शिक्षकांनी शिक्षण सुरू केले आहे. अधिकारी खोटे बोलतात. जिल्ह्यात ऑनलाईन शिक्षण कुठेच यशस्वी नाही. 
- नीलेश सांबरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद.

हेही वाचा : फळं आणि भाज्या सॅनिटायझ करण्यासाठीचा जबरदस्त घरगुती फंडा...एकदा 'ट्राय'तर करा...

ऑनलाईन शिक्षण सुरू असलेल्या तालुकानिहाय शाळांची जिल्हा परिषदेची आकडेवारी

 • एकूण जिल्हा परिषद शाळा - 2,131 
 • विद्यार्थीसंख्या - 1 लाख 72 हजार 187 
 • ऑनलाईन शिक्षण सुरू असलेल्या शाळा - 1,198. 
 • खासगी शाळा - 1,269 
 • ऑनलाईन शिक्षण सुरू - 927. 

एकूण शाळांपैकी सुरू असलेल्या ऑनलाईन शाळा

 • वसई - 194 पैकी 89 
 • पालघर - 410 पैकी 163 
 • डहाणू - 459 पैकी 250 
 • तलासरी - 155 पैकी 154 
 • मोखाडा - 155 पैकी 103 
 • जव्हार - 227 पैकी 107 
 • वाडा - 296 पैकी 208 
 • विक्रमगड - 235 पैकी 124. 
 • एकूण - 2,131 पैकी 1,198 
   

------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online education has not reached Palghar district; Lack of mobile, Television, radio and internet students stay away from education