esakal | एका बाकावर फक्त एकच विद्यार्थी; शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
sakal

बोलून बातमी शोधा

student

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

एका बाकावर फक्त एकच विद्यार्थी; शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार शाळा प्रत्यक्षात सुरू करताना व्यवस्थापन समितीने एका वर्गात एक बाकावर एक विद्यार्थी किंवा एका वर्गात 20 ते 30 विद्यार्थी अशी व्यवस्था करावी; तसेच विद्यार्थांच्या बैठक व्यवस्थेत किमान एक मीटर अंतर ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मोठी बातमी : ग्रामीण भागात भरणार शाळा अन् अन्यत्र ऑनलाईन शिक्षण; नव्या शैक्षणिक वर्षास मान्यता

नवीन शैक्षणिक वर्ष ऑनलाईन सुरू करण्याची घोषणा करणाऱ्या शिक्षण विभागाने अखेर शाळा भरवण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक काढले आहे. विदर्भात 26 जूनला, तर उर्वरित ठिकाणी 15 जूनला शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वीची तयारी, साफसफाई, शाळा सुरू झाल्यानंतर घ्यावयाची दक्षता, विद्यार्थांची गर्दी होऊ नये म्हणून करायचे नियोजन याबाबत शाळा व्यवस्थापन समिती निर्णय घेणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या झोनमधील शाळा कधी सुरू करायच्या, याबाबत जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी निर्णय घ्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वाची बातमी मुंबई विमानतळावरुन विमान उड्डाणांची संख्या वाढणार, 'या' तारखेपासून होणार सुरुवात

शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखणे शक्य व्हावे, यासाठी दोन सत्रांची पद्धत, एक सत्र जास्तीत जास्त तीन तासांचे किंवा वेगवेगळ्या वर्गांतील विद्यार्थ्यांनी एक दिवस सोडून शाळेत यावे, याबाबत व्यवस्थापन समिती विचार करेल, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. स्कूल बस, रिक्षामध्ये मुलांची गर्दी होऊ नये यासाठी काय व्यवस्था करावी, हे शाळा व्यवस्थापन समितीने ठरवावे. मुलांनी शाळेत पायी किंवा सायकलने यावे, पालकांनी स्कूटर, सायकलवरून सोडावे, असे पर्याय सुचवण्यात आले आहेत.

नक्की वाचा : एका कोरोनाबाधित डॉक्टरामुळे अख्खं गाव हदरलं!, 300 हून अधिक रुग्ण संपर्कात

डिजिटल शिक्षण

  • विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा विचार व्हावा.
  • पूर्वप्राथमिक, पहिली-दुसरीसाठी ऑनलाईन शिक्षण नको; या विद्यार्थ्यांना टीव्ही व रेडिओवरील कार्यक्रम दाखवावेत.
  • तीसरी ते पाचवी : दिवसाला कमाल एक तास.
  • सहावी ते आठवी : दिवसाला कमाल दोन तास.
  • नववी ते बारावी : दिवसाला कमाल तीन तास.

राज्य सरकारने शाळा सुरू करण्याची जबाबदारी नेहमीप्रमाणे मुख्याध्यापकांवर सोपवली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अनुदानित शाळांसाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. सरकारने शाळांना एका लाखाची तात्पुरती मदत द्यायला हवी.
- प्रशांत रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना

शाळा व्यवस्थापन समितीची बैठक 15 जूनला घेण्याचे परिपत्रक शिक्षण विभागाने त्याच दिवशी दुपारी काढले. त्यावरून सरकारचा नियोजनशून्य कारभार समोर आला आहे. या परिपत्रकातही अनेक त्रुटी आहेत.
- सुभाष मोरे, कार्याध्यक्ष, शिक्षक भारती

Only one student on a bench; Guidelines issued by the Department of Education