ग्रामीण भागात भरणार शाळा अन् अन्यत्र ऑनलाईन शिक्षण; नव्या शैक्षणिक वर्षास मान्यता

school.
school.

मुंबई : कोरोना महामारीमुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, शहरांपासून दूरच्या शाळा प्रत्यक्ष सुरू कराव्यात. ऑनलाईन, डिजिटल पद्धत पथदर्शी प्रकल्प म्हणून तातडीने राबवावी, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मान्यता दिली.

सोमवारी (ता. 15) दुपारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शाळा एकवेळ सुरू नाही झाल्या; तरी शिक्षण सुरू झाले पाहिजे, या विधानाचा पुनरुच्चार केला. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय उपस्थित होते. शाळा प्रत्यक्ष सुरू होत असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वतोपरी घ्यावी, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. शाळा सुरू करण्यासाठी आधी व्यवस्थापन समित्यांची सभा घेतली जाईल, गावांमधील कोरोना प्रतिबंध समित्या व स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सोय आदी कामे केली जातील. गटागटाने पालक सभा घेऊन मनातली भीती कमी करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

बाल रक्षक व शिक्षकांनी शाळाबाह्य होण्याची शक्यता असलेली मुले व स्थलांतरित मजुरांच्या घरी जाऊन त्यांचे मन वळवायचे आहे. सरल प्रणाली अद्ययावत करणे व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक भरणे, ग्रामपंचायतीच्या मदतीने टीव्ही, रेडिओ यांची व्यवस्था करणे आदी कामांवर भर दिला जाईल. त्याद्वारे कुठलीही सोय नसलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत होईल, गुगल क्लासरूम, वेबिनार आदी डिजिटल पर्यायांचा प्रायोगिक तत्त्वावर वापर, शैक्षणिक ई-साहित्याची निर्मिती, सायबर सुरक्षा, दीक्षा मोबाईल ॲपचा वापर, शाळेतील ध्वनिक्षेपकावरून विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती देणे या मुद्द्यांवरही चर्चा झाली.

असे आहे नियोजन
रेड झोनमध्ये नसलेल्या भागात नववी, दहावी, बारावीचे वर्ग जुलैमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे. सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टमध्ये, तिसरी ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरमध्ये, पहिली आणि दुसरीचे वर्ग शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने भरवण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे अकरावीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी शाळा सुरू होणार नाहीत तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पथदर्शी प्रकल्प लगेच सुरू करून नियमित आढावा घेतला जाईल, असे ते म्हणाले. काही कंपन्यांनी इतर राज्यांत केलेल्या प्रयोगांची परिणामकारकता तपासावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

माहिती व नभोवाणी मंत्र्यांशी बोलणार
शिक्षणासाठी दूरदर्शन आणि आकाशवाणीचा वापर करण्याची विनंती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. त्यावर माहिती व नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी लगेच बोलून ही माध्यमेही उपलब्ध केली जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पहिली, दुसरीसाठी ऑनलाईन नाही
ऑनलाईन वर्गांबाबत पालकांच्या मतांचा विचार करण्यात आला आहे. पहिली व दुसरीतील मुले लहान असतात, त्यांच्यासाठी ऑनलाईन पर्याय दिला जाणार नाही. तिसरी ते पाचवीतील मुलांना दररोज एक तास आणि पुढील वर्गांतील मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाईन शिक्षण देण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.

कोकणातील शाळांची दुरुस्ती
चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झालेल्या कोकणातील शाळांना तातडीने दुरुस्तीसाठी निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यासाठी 28 कोटींची मागणी शिक्षण विभागाने केली आहे.

school start in rural areas and elsewhere online education; Recognition for the new academic year

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com