अमृता फडणवीसांवर होणाऱ्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे पत्रकार परिषदेतून थेट उत्तर

सुमित बागुल
Saturday, 28 November 2020

आज महाराष्ट्राचे विरोधीपक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

मुंबई : आज महाराष्ट्राचे विरोधीपक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये भाजपकडून पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त विरोधीपक्षाला सरकारबद्दल, सरकारच्या कामाबद्दल काय वाटतं हे सांगण्यात येईल. दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली. 

महत्त्वाची बातमी : फडणवीसांना राऊतांचं जशास तसं उत्तर; "सगळ्यांच्या कुंडल्या मी घेऊन बसलो आहे" वक्तव्याची करून दिली आठवण

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर अनेकदा झालेल्या टीकेची आठवण करून दिली. अमृता फडणवीस यांनी महिलांच्या सशक्तीकरणाबाबत ‘तिला जगू द्या’ हे गाणं गायलं होतं. ज्यावर अनेकांनी अमृता  फडणवीस यांच्यावर टीका केली होती. काहींनी तर वाईट शब्द देखील वापरलेत. केवळ त्या एकाच गोष्टीवरून नव्हे तर अनेक मुद्द्यांवरून अमृता फडणवीस यांच्यावर टीका झाल्याचं फडणवीस आज पत्रकार परिषदेत म्हणालेत. 

महत्त्वाची बातमी : "महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री आजवर पाहिले नव्हते"; सरकारवर फडणवीसांचा हल्लाबोल

महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालंय. यानिमित्ताने सामनाचे संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी "जर आमच्या किंवा आमच्या कुटुंबीयांच्या वाट्याला कोणी गेलं तर त्यांनाही मुलं आहेत", असं वक्तव्य केलं होतं. ज्यावर फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला होता.

यावर उत्तर देताना फडणवीस म्हणालेत की, "आम्ही कुणाच्या घरच्यांवर हल्ला, आम्ही कुणाच्या घरच्यांवर टीका केलेली नाही. जर घरच्यांच्या टीकेबाबत बोलायचंच झालं तर याचं सर्वात मोठं उदाहरण मी स्वतः आहे. माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे अधिकृत नेते ट्विटरवर काय टाकतात, काय बोलतात हे सर्वांना ठाऊक आहे. मी त्याचा कांगावा करत नाही. आम्ही संयमाने वागतो", असं फडणवीस म्हणालेत. 

opposition leader devendra fadanavis on political taunting at press conference


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: opposition leader devendra fadanavis on political taunting at press conference