...अन्‌ प्रशासनाला खडबडून जाग आली; सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 February 2020

नवी मुंबई महापालिकेच्या महापे येथील शाळेतील 14 अल्पवयीन मुलींसोबत शिक्षकाने अश्‍लील वर्तन केल्याची घटना गुरुवारी (ता.27) उघडकीस आली. त्यामुळे पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व पालिका शाळांमध्ये तत्काळ सीसी टीव्ही यंत्रणा बसवण्याचे आदेश आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी अभियांत्रिकी विभागाला दिले आहेत.

नवी मुंबई : पालिकेच्या महापे येथील शाळेतील 14 अल्पवयीन मुलींसोबत शिक्षकाने अश्‍लील वर्तन केल्याची घटना गुरुवारी (ता.27) उघडकीस आली. त्यामुळे पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी सर्व पालिका शाळांमध्ये तत्काळ सीसी टीव्ही यंत्रणा बसवण्याचे आदेश आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी अभियांत्रिकी विभागाला दिले आहेत. तसेच आरोपी शिक्षक हा सीएसआर निधीतून आलेला प्रशिक्षक होता. त्यामुळे यापुढे सीएसआर निधीतून उपलब्ध होणाऱ्या प्रशिक्षकांचे चारित्र्य पडताळणीनंतरच त्यांना शाळेत घेण्याच्या स्पष्ट सूचना मिसाळ यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. 

ही बातमी वाचली का? ...आता नवी मुंबई महापालिकेतही पाच दिवसांचा आठवडा

पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका शिक्षकाकडून मुलीसोबत अश्‍लील वर्तन करण्याची घटना घडली. या घटनेमुळे पालिका शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शाळांमध्ये येणाऱ्या गरीब घरातील मुलींच्या सुरक्षेसाठी सीसी टीव्ही यंत्रणा बसवण्याचा प्रस्ताव याआधीच प्रशासनाने आणला आहे. मात्र, त्याला प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे प्रक्रिया रखडलेली होती. त्यातच महापे येथील शाळेत घडलेल्या अपकृत्यामुळे कोणतीही जोखीम न पत्करण्याच्या भूमिकेत आता प्रशासन आले आहे. पालिकेच्या 55 शाळा इमारतींमध्ये तब्बल 687 अत्याधुनिक सीसी टीव्ही यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. हे कॅमेरे बसवण्यासाठी तब्बल तीन ते चार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. मिसाळ यांच्या सूचनेनंतर शुक्रवारी (ता.28) अभियांत्रिकी विभागातर्फे यासाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता पालिका शाळांवर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. 

ही बातमी वाचली का? निवडणूक आयोगाचा एक निर्णय, अन्‌ राजकारण्यांच्या स्वप्नांवर पाणी!

महिला प्रशिक्षिका नेमण्यावर भर 
नवी मुंबईत कार्यरत असणाऱ्या अनेक खासगी संस्था या त्यांच्या श्रेयासाठी पालिकेकडे सीएसआर माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे करीत असतात. सध्या एलऍण्डटी, ऍमेझॉन, डी-मार्ट अशा नामांकित कंपन्यांकडून पालिकेच्या शाळेत संगणक प्रशिक्षण शाळा, ग्रंथालय, मुलांना बसण्यासाठी बाके, वर्गातील फर्निचर आदी सुविधा देत आहेत. तसेच संगणक शिकवण्यासाठी प्रशिक्षकही उपलब्ध करून देत आहेत. परंतु महापे शाळेतील विनयभंगाच्या घटनेनंतर आता सीएसआर फंडातून उपलब्ध होणाऱ्या शिक्षकांची चारित्र्य पडताळणी केल्याशिवाय मदत न घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच शाळांवर महिला प्रशिक्षिका नेमण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. 

महापे शाळेत घडलेली घटना दुर्दैवी आहे. या घटनेनंतर सर्व शाळांमध्ये तत्काळ सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. तसेच सीएसआरमधून मदत करणाऱ्या संस्थांकडून उपलब्ध होणाऱ्या प्रशिक्षकांची चारित्र्य पडताळणीनंतरच मदत घेण्यात येईल. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order to install CCTV in Navi Mumbai Municipal Schools