पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात पद्मसिंह पाटीलांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 March 2020

पवनराजे निंबाळकर यांच्या १४ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येच्या खटल्यातील प्रमुख आरोपी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांना शुक्रवारी (ता. ६) मुंबई उच्च न्यायालयाने अंशतः दिलासा दिला. या खटल्यातील दोन साक्षीदारांची जबानी नोंदवण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

मुंबई : पवनराजे निंबाळकर यांच्या १४ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येच्या खटल्यातील प्रमुख आरोपी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांना शुक्रवारी (ता. ६) मुंबई उच्च न्यायालयाने अंशतः दिलासा दिला. या खटल्यातील दोन साक्षीदारांची जबानी नोंदवण्याची परवानगी न्यायालयाने दिली; मात्र काही कागदपत्रांची नोंद आणि अन्य २० हून अधिक साक्षीदारांची जबानी घेण्याची मागणी न्यायालयाने अमान्य केली. 

ही बातमी वाचली का? सावधान! तुमच्या होळीच्या रंगात बसलाय कोरोना?

पद्मसिंह पाटील यांनी अॅड. भूषण महाडिक यांच्यामार्फत उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर न्या. एन. जे. जमादार यांच्यापुढे सुनावणी झाली होती. उच्च न्यायालयाने शुक्रवारी निकालपत्र जाहीर केले. त्यानुसार पाटील यांना दोन साक्षीदारांची जबानी नोंदवण्याची परवानगी देण्यात आली. अन्य २० हून अधिक साक्षीदारांची जबानी आणि काही कागदपत्रांची नोंद घ्यावी, यासाठी पाटील सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहेत. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. ही मागणी उच्च न्यायालयाने नामंजूर केली. 

ही बातमी वाचली का? ...प्रवेशद्वाराचं मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छापत्र; महिला कर्मचारी आनंदित

संबंधित साक्षीदारांचा या प्रकरणाशी महत्त्वाचा संबंध आहे. सीबीआयने त्यांचा साक्षीदार म्हणून समावेश करायला हवा. पोलिसांनी या साक्षीदारांचा जबाब नोंदवला आहे, मात्र सीबीआयने दखल घेतली नाही, असे पाटील यांचे म्हणणे आहे. यापूर्वी त्यांनी विशेष सीबीआय न्यायालयातही अर्ज केला होता. परंतु, हा अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली. नवी मुंबईतील कळंबोली येथे जून २००६ मध्ये दिवसाढवळ्या पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या वाहनचालकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची सुपारी पद्मसिंह पाटील यांनी दिल्याचा जबाब आरोपी पारसमल जैन याने दिला आहे, असा
पोलिसांचा दावा आहे.

ही बातमी वाचली का? ठाण्यातील ...या गृहनिर्माण प्रकल्पात पुन्हा अडथळा?

खटला अंतिम टप्प्यात
पवनराजे निंबाळकर हत्या खटला अंतिम टप्प्यात आला असून, साक्षीपुरावे नोंदवण्याचे काम सुरू आहे. सीबाआयने आतापर्यंत ११७ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Padmasinh Patil consoles in Pawanraj Nimbalkar murder case