निकाल तर लागला मात्र आता प्रवेशाचे टेन्शन; सीईटीच्या परीक्षेसाठी उजाडणार सप्टेंबर..

तेजस वाघमारे 
Thursday, 16 July 2020

बहुप्रतिक्षित बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र

मुंबई: बहुप्रतिक्षित बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. 

ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबर महिन्यात सीईटी परीक्षा घेण्यात येणार असून याचे वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता परिक्षेबरोबरच प्रवेशाच्या टेन्शनला सामोरे जावे लागणार आहे. सीईटी सेलच्या वतीने राज्यातील अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी राज्यातील 5 लाख 24 हजार 907 विद्यार्थांनी नोंदणी केली आहे.

हेही वाचा: अरे वाह! दुबईत अडकून पडलेले तब्बल 'इतके' श्रमिक महाराष्ट्रात दाखल; उद्योजक धनंजय दातार यांची मदत..  

ही परीक्षा 4 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. राज्यात कोरोनाचा प्रभाव झपाट्याने वाढत असल्यामुळे अखेर ही परीक्षा उच्चशिक्षण विभागाला पुढे ढकलावी लागली आहे. या सर्व परीक्षांच्या तारखा अद्याप नव्याने जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या परीक्षांच्या तारखांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

जेईई, नीट आणि सीईटी या अभ्यासक्रमाच्या परीक्षा आयबीपीएस ही एकमेव संस्था घेते. यंदा कोरोनामुळे या परीक्षांचे वेळापत्रक बिघडले असल्याने या संस्थेला सर्व परीक्षा सप्टेंबर महिन्यात घ्याव्या लागत आहेत. जेईई, नीट परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सीईटी परीक्षांच्या तारखा आणि इतर अभ्यासक्रमाच्या तारखा पाहून सीईटी परीक्षेचे वेळापत्रक निश्चित केले जाणार आहे.

 सीईटी सेल सीईटी परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यासाठी संस्थेकडे पाठपुरावा करत आहे. त्यानुसार लवकरच सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होईल. सीईटी परीक्षा सुमारे 14 दिवस चालेल असे सीईटी सेलमधील अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई विद्यापीठाची नोंदणी उद्यापासून:

बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होताच मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येते. तेरावी प्रवेशासाठी नोंदणी करण्याची प्रकिया गुरुवारी रात्री किंवा शुक्रवारी जाहीर होईल, असे विद्यापीठातील अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा: अरे बापरे!  लॉकडाऊन काळात तणावासोबत वाढतोय संताप; 'हे' आहे मुख्य कारण..वाचा महत्वाची बातमी..

गुणवत्ता यादी, कागदपत्र पडताळणीचा पेच कायम:

मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयाची प्रवेश प्रकिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थांना अनेक संकटाना सामोरे जावे लागणार आहे. गुणवत्ता यादी पहाण्यासाठी विद्यार्थांना महाविद्यालयात जावे लागते, तसेच कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरण्यासाठी विद्यार्थांना महाविद्यालय गाठावे लागते. याबाबत विद्यापीठ स्तरावर पेच असून तो सोडविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महाविद्यालयांनी यासाठी ऑनलाइन सुविधा द्यावी, यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

parents have tension of admission of students now 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parents have tension of admission of students now