नायगाव रेल्वेस्थानकातील पूर्वेकडील रस्ता अचानक बंद केल्याने प्रवासी संतप्त

naigaon
naigaon

विरार : पश्‍चिम रेल्वेवरील नायगाव स्थानकातील पूर्वेकडील रस्ता रेल्वेने काल (ता. 13) मध्यरात्री अचानक बंद केल्याने सकाळी अनेक प्रवाशांना त्याचा नाहक त्रास झाला. त्यामुळे सकाळी काही वेळ रेल्वे स्थानकातील वातावरण गरम झाले होते. दरम्यान, यात शिवसेनेने उडी घेतल्याने पुन्हा एकदा रेल्वे गाड्या बंद करण्याचे आंदोलन होते की काय, अशी वेळ आली होती; परंतु स्टेशन मास्टर आणि पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन होता होता राहिले. तसेच बुधवारी हायकोर्टाचा आदेश असतानाही वकिलांना लोकलमधून प्रवास करण्यास मनाई करण्यात आल्याने वकिलांमध्येही नाराजी होती. 

कोरोनामुळे अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू असतानाच काल मध्यरात्री मात्र अचानकपणे रेल्वे मंत्रालयातून आदेश येऊन स्थानकातील एकच मार्ग सुरू ठेवण्याचे आदेश आले, त्यामुळे पोलिसांनी नायगाव पूर्वेकडील स्थानक बंद केल्याने पूर्वेकडील प्रवाशांना पश्‍चिमेला जाऊन पुन्हा स्थानकातील जिना चढून पूर्वेकडून मुंबईला जाणारी लोकल पकडावी लागत असल्याने अनेकांना सकाळी कामावर पोहोचण्यास उशीर झाला. पूर्वेकडील रस्ता आणि तिकीट खिडकी बंद केल्याचे समजल्यावर शिवसेनेने याविरोधात थेट स्टेशन मास्टर कार्यालय गाठले; परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने आंदोलन मात्र झाले नाही. परंतु सेनेच्या शिष्टमंडळाने रेल्वेला 24 तासांची मुदत दिली असून पूर्वेकडील रस्ता आणि तिकीट खिडकी सुरू न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. बुधवारी स्टेशन मास्टरांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व उपविभाग प्रमुख मायकल मोझेस यांनी केले. त्यांच्याबरोबर शाखा प्रमुख संतोष कानसे, मंगेश चव्हाण, सुरेश भोगले, समाधान निकम यांचा समावेश होता. यावेळी तालुका प्रमुख जगनाथ म्हात्रे यांनी दिलेले निवेदन स्टेशन मास्तरांना दिले. 

काल रात्री आम्हाला रेल्वेस्थानकातील एकच मार्ग सुरू ठेवण्याचे आदेश आल्याने आम्ही पूर्वेकडील मार्ग बंद करून पश्‍चिमेकडील मार्ग सुरू ठेवला आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण करता येत आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिलेले निवेदन वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहे. त्यांनी निर्णय दिल्यावर मार्ग खुला करून तिकीट खिडकी सुरू करू. 
- संतोष पाटील, स्टेशन मास्टर, नायगाव. 

कोणतीही पूर्वसूचना न देता नायगाव पूर्वेकडील रेल्वेस्थानकात जाणारा रस्ता बंद करण्यात आला, तसेच तिकीट खिडकीही बंद करण्यात आली. त्यामुळे पूर्वेकडील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अगोदरच पूर्वेकडच्या लोकांना स्टेशनला यायला 1 किलोमीटर चालत यावे लागते. त्यात पुन्हा वळसा घालून पश्‍चिमेला जाऊन पुन्हा पूर्वेकडे येऊन मुंबईला जाणारी लोकल पकडावी लागते. महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी केंद्रातील सरकार असे आदेश देत आहे. जर येत्या 24 तासांत तिकीट खिडकी सुरू करून स्थानकात जाण्याचा मार्ग सुरू न केल्यास मोठे आंदोलन करू. 
- मायकल मोझेस, उपविभाग प्रमुख शिवसेना. 

सकाळी अचानक पूर्वेकडील रेल्वेस्थानकात जाण्याचा मार्ग बंद झालेले पाहिल्याने पुन्हा पश्‍चिमेकडे जाऊन पूर्वेकडे येईपर्यंत उशीर झाला. त्यामुळे कामावर पोचण्यास उशीर झाला. रेल्वेने तातडीने हा रस्ता सुरू करावा. 
- राज घरत, प्रवासी. 

जूचंद्र, परेरा नगर, टीवरी, राजावली, चंद्रपाडा, बापाने, मालजीपाडा, सासुनवघर, ससूपाडा, कामण, चिंचोटी, देवदल, नागले, पोमण या ठिकाणाहून हजारो चाकरमानी पूर्वेकडून नायगाव स्थानकात लोकलसाठी येत असतात. 

(संपादन : वैभव गाटे)

Passengers frustrated due to sudden closure of east road at Naigaon railway station

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com