वसईतील रस्त्यांवर दिसू लागलेत थंडगार ताडगोळे; नागरिकांची खरेदीसाठी लगबग | Vasai News Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tadgole fruit

वसईतील रस्त्यांवर दिसू लागलेत थंडगार ताडगोळे; नागरिकांची खरेदीसाठी लगबग

विरार : गेल्या आठवडाभरापासून उन्हाचा तडाखा (Summer) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा उष्णतेत अंगाची होणारी काहिली कमी करण्यासाठी अनेक जण ऊसाचा रस, लिंबू सरबत, कैरीचे पन्हे, शहाळे असे अनेक पर्याय निवडतात. काहींना थंडगार पेयांचा, आईसक्रीमचा मोहदेखील अनावर होतो, परंतु या थंड पदार्थांचा (cold drinks) शरीरावर परिणाम होऊन सर्दी-खोकल्याचा (Health issues) त्रास होतो किंवा इतर शारीरिक व्याधी जडतात. अशा वेळी आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम न करणाऱ्या आणि शरीराचा दाह कमी करणाऱ्या ताडगोळ्यांचा (Tadgole Fruits) पर्याय स्वीकारला जातो. सध्या हेच ताडगोळे वसईतील रस्त्यारस्त्यांवर दिसत असून, नागरिकांची पावले हे ताडगोळे खरेदीसाठी वळत आहेत.

हेही वाचा: मोखाडा : वाघाशी झुंज! पतीने वाचवले पत्नीचे प्राण

मुंबई, ठाण्याप्रमाणेच वसईतही उन्हाचा पारा चाळिशीपार गेल्याने उष्णतेचे प्रचंड चटके बसू लागले आहेत. यावर उपाय म्हणून रस्त्याच्या कडेला ताडगोळे विकणाऱ्यांकडे नागरिकांची पावले वळत आहेत. वसईतील अनेक मार्गांवर, रस्त्याच्या कडेला, तसेच पर्यटनस्थळी ताडगोळे विक्रेते बसले आहेत. वसईच्या किनारपट्टीवर तसेच वसई किल्ला या ठिकाणी ताडाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत.

ताडाच्या झाडावरून ताडफळ काढून ते ताडमालकाकडून विकत घेतले जातात. त्यानंतर हे फळ फोडून ताडगोळ्यांची विक्री केली जाते. यात मोठी मेहनत असते; मात्र जिकिरीचे काम म्हणून झाडावरून ताडफळ काढण्याचा मोठा अनुभवही असावा लागतो. दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत या तोडगोळ्यांच्या विक्रीतून चांगला हंगामी रोजगार मिळून जातो, असे विक्रेते सांगतात.

ताडगोळे हे शीतलता देणारे, ताडीपेक्षा वेगळ्या चवीचे फळ आहे. आरोग्याच्या दृष्टीने लाभदायी असलेल्या ताडगोळ्यांना चांगली मागणीही आहे. साधारण दोन महिने या ताडगोळ्यांचा व्यवसाय चालतो. वसईच्या किनारपट्टीवर आणि इतर पर्यटनस्थळी नागरिकांची गर्दी होत असल्याने या थंडगार ताडगोळ्यांना चांगलीच मागणी आहे.

हेही वाचा: रायगड: जलवाहतूक दहा टक्क्याने स्वस्त होणार; सरकारच्या निर्णयाचा प्रवाशांना फायदा

सध्या गरमी वाढल्याने ताडगोळ्यांना ग्राहकांची चांगली मागणी आहे. सर्व खर्च काढून दिवसाकाठी ५०० ते ८०० रुपये ताडगोळे विक्रीतून मिळतात. ताडफळे लांबून आणावी लागत असल्यामुळे नफा कमी होतो, परंतु मागणी अधिक असल्याने खर्च भरून निघतो.
- देहू भंडारी, ताडगोळे विक्रेते, वसई

ताडगोळे आरोग्यदायी

१) उन्हाळ्यात आंबा, फळस याप्रमाणेच ताडगोळे भरपूर प्रमाणात मिळतात. हे हंगामी फळ असून, समुद्रकिनारी जास्त प्रमाणात मिळते. उन्हाच्या काहिलीत ताडगोळे शरीराला थंडावा तर देतातच, शिवाय ते आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतात. नारळाप्रमाणे थंडगार आणि एखाद्या पारदर्शक जेलीप्रमाणे असलेले हे फळ अतिशय गुणकारी आणि आरोग्यदायी आहे.
२) ताडगोळ्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, लोह, झिंक, पोटॅशिअम, फॉस्फरस, कॅल्शिअम असे अनेक गुणधर्म असतात. ज्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यापासून रोगप्रतिकार शक्ती वाढेपर्यंत अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे मधुमेही अथवा हृदयविकार असलेलेही ताडगोळे खाऊ शकतात.

Web Title: People Interested To Purchase Tadgole Fruit In Summer Vasai News Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :summerFruitvasai virar