पालिकेकडून लता मंगेशकर यांची इमारत सील, मंगेशकर कुटुंबियांकडून निवेदन सादर

पूजा विचारे
Sunday, 30 August 2020

गानसम्राज्ञी लता मंगेशकर राहत असलेली प्रभुकुंज सोसायटी मुंबई महापालिकेनी सील केली आहे. पेडर रोडवरील प्रभुकुंज सोसायटीत कोरोनाचा रुग्ण आढळल्याने मुंबई महापालिकेकडून ही इमारत सील केल्याची माहिती समोर आली आहे.  

मुंबईः गानसम्राज्ञी लता मंगेशकर राहत असलेली प्रभुकुंज सोसायटी मुंबई महापालिकेनी सील केली आहे. पेडर रोडवरील प्रभुकुंज सोसायटीत कोरोनाचा रुग्ण आढळल्याने मुंबई महापालिकेकडून ही इमारत सील केल्याची माहिती समोर आली आहे.  प्रभुकुंज सोसायटीत गेल्या आठवड्यात पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोविड -19 चा धोका टाळण्यासाठी सावधगिरी म्हणून शनिवारी लता मंगेशकर यांची इमारत सील करण्यात आली.  महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून काल संध्याकाळी ही कार्यवाही केली.

तसंच लता मंगेशकर आणि त्यांचे कुटुंबिय सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रभुकुंज सोसायटीत लता मंगेशकर यांच्यासह त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर वास्तव्यास आहेत. याशिवाय या इमारतीमध्ये अनेक वृद्ध मंडळी आहेत. म्हणून सोसायटीतील सर्व रहिवाश्यांच्या एकमताने सोसायटी सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

90 वर्षीय लता मंगेशकर यांनी याबाबत एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं होतं. लता मंगेशकर यांचे घर दक्षिण मुंबईतील चांबाला हिल भागात आहे. सोसायटीत काही वयस्कर रहिवासी देखील वास्तव्यास आहेत. त्यामुळे पालिकेनं ही इमारत सील करावी असं पत्र लता मंगेशकर यांनी सादर केलं होतं. 

हेही वाचाः  मुंबईत पावसाचा जोर ओसरणार; पण ठाणे, रायगड पालघरमध्ये कसा असेल हवामानाचा अंदाज

लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांनी अधिकृत निवेदनाद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. प्रभूकुंज सील केल्यानंतर इमातर सील का केली गेली. काही धोका आहे का असे संध्याकाळपासूनच नातेवाईकांचे फोन सुरू झाले, असं कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे. 

यावर  मंगेशकर कुटुंबियांकडून सांगितलं की, सोसायटीतील रहिवासी आणि महापालिका प्रशासनाने मिळून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सोसायटी सील करण्याचा निर्णय घेतला आहे. वयस्कर रहिवाशांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी आपल्याला अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड सतर्क राहणं जरुरीचं आहे. 

अधिक वाचाः  'सिग्नल फ्री मुंबई' प्रोजेक्टला कोरोनाचा स्पीडब्रेकर; कोस्टल रोडलाही मुदतवाढ देण्याचा BMCचा निर्णय

आमच्या सोसायटीत साधेपणानेच गणेशोत्सव साजरा केला जात आहे. देवाची कृपा आणि अनेकांच्या शुभेच्छांमुळे आमचे कुटुंब सुरक्षित आहे. आमच्या कुटुंबातील सर्वांची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे कुटुंबीयांबाबत कृपया कोणीही अफवा पसरवू नका. एक कुटुंब म्हणून सोसायटीतील सर्वजण कोरोनाबाबत सतर्क असून कोरोना रोखण्याबाबतच्या नियमांचं काटेकोरपालन करत आहेत. आपण एकमेकांची चांगली काळजी घेतली पाहिजे आणि समाजात ऐक्य निर्माण करून सुरक्षितता बाळगली पाहिजे. खासकरून सर्व ज्येष्ठ नागरिकांची आणि इतरांची काळजी घ्या, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

playback legend Lata Mangeshkar residential Prabhukunj building sealed by BMC


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: playback legend Lata Mangeshkar residential Prabhukunj building sealed by BMC