esakal | पोलिसांना कठोर कारवाई करण्यापासून रोखा, रश्मी शुक्लांची उच्च न्यायालयात याचिका
sakal

बोलून बातमी शोधा

rashmi shukla

पोलिसांना कठोर कारवाई करण्यापासून रोखा, रश्मी शुक्लांची उच्च न्यायालयात याचिका

sakal_logo
By
सुनिता महामुणकर - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: फोन टॅपिंग आणि गोपनीय कागदपत्रे लिक केल्याच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या फौजदारी फिर्यादीमध्ये माझ्याविरोधात कठोर कारवाई करु नये, अशी मागणी याचिकेत केली आहे. पोलीस बदल्यांसंबंधित महत्त्वाची कागदपत्रे लिक केली आहेत आणि अनेक राजकीय व्यक्ती- अधिकाऱ्यांचे फोन कॉल्स विनापरवानगी टॅप केले आहेत, अशी तक्रार महाराष्ट्र गोपनीय माहिती विभागाकडून बीकेसी सायबर गुन्हे विभागात अज्ञात व्यक्तिंविरोधात केली आहे.

या तक्रारीवरुन त्यांना पोलिसांनी एप्रिलमध्ये दोन वेळा चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र शुक्ला अद्याप चौकशीला हजर झालेल्या नाहीत. या पार्श्वभुमीवर आता त्यांनी एड समीर नांगरे यांच्यामार्फत न्यायालयात याचिका केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक माझ्या विरोधात बोगस तक्रार दाखल केली आहे. पोलीस बदल्यांमध्ये मंत्री आणि राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांकडून कशाप्रकारे भ्रष्टाचार केला जातो हे मी पोलिस महासंचालकांना पत्राद्वारे सांगितले. खरेतर यासाठी माझे कौतुक व्हायला हवे, मात्र माझ्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

हेही वाचा: पाकिस्तानने खरे रंग दाखवले, दोन महिन्यात मोडला करार

याप्रकरणी पोलीस मला अटक करण्याची शक्यता आहे, त्यामुळे याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊन पोलिसांना कठोर कारवाई करण्यापासून रोखावे, अशी मागणी याचिकेत केली आहे. उद्या यावर तातडीची सुनावणी होण्याची शक्यता आहे. हैदराबादमध्येही शुक्ला यांनी याचिका केली आहे.

हेही वाचा: 'या' महिन्यात मुंबई सुरक्षित असेल आणि शाळाही येतील उघडता

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालकांना लिहिलेले गोपनीय पत्र जाहीर केले आहे. तसेच काही कागदपत्रे आणि फोन कॉल्सची माहिती दिली आहे. त्यावेळी शुक्ला राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. राज्याचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांनी या प्रकरणाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सादर केला आहे. फडणवीस यांना मिळालेली गोपनीय माहिती शुक्ला यांनीच लिक केली असा दावा यामध्ये आहे. त्यानंतर पोलीस फिर्याद दाखल करण्यात आली. शुक्ला सध्या हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस विभागाचे अतिरिक्त विभागीय संचालक म्हणून काम पाहत आहेत. भारतीय पोलीस दलात त्या सन 1988 च्या बॅचपासून रुजू झाल्या.

loading image