आरे कॉलनीत लॉकडाऊनचा फज्जा, 33 जणांविरोधात गुन्हा

पूजा विचारे
Sunday, 12 July 2020

आरे कॉलनीमध्ये काही जण लॉकडाऊनचे नियमाची पायमल्ली करत पार्टी करताना आढळलेत. पोलिसांनी पार्टी करणाऱ्या  33 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

मुंबई-  कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. मुंबई शहर हे कोरोनाचं हॉटस्पॉट आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. आवश्यक कामासाठीच लोकांनी घराबाहेर पडावं असं वारंवार आवाहन करण्यात येतं आहे. मात्र काही बेजबाबदार नागरिक या नियमाची पायपल्ली करताना आढळत आहेत. अशातच आरे कॉलनीमध्ये काही जण लॉकडाऊनचे नियमाची पायमल्ली करत पार्टी करताना आढळलेत. पोलिसांनी पार्टी करणाऱ्या  33 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्टी करणाऱ्या लोकांनी मास्क घातले नव्हते तसंच त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचंही पालन केलं नव्हतं. 

शनिवारी पोलिसांनी आरे कॉलनीतील रॉयल पाम्स येथे अनेक बंगल्यांवर छापा टाकले. जिथे लोक शनिवार आणि रविवारी पार्टीसाठी येत होते. आपत्ती व्यवस्थापन कायदा, महामारी रोग अधिनियम तसंच भारतीय दंड संहितेअंतर्गत 33 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही लोकं मुंबईच्या विविध भागातून आली होती. तर काही जण गुजरात मधून आल्याचं कळतंय. 

हेही वाचा- राज्यकर्ते कोरोनाचे प्रायश्चित कधी घेणार?, संजय राऊतांचा रोखठोक सवाल 

कॉलनीतील रहिवाशांनी रात्री 7.30 च्या सुमारास चार व्हिलामधील पार्टीबद्दल पोलिसांना माहिती दिली. ज्यानंतर पोलिस तात्काळ त्या ठिकाणी पोहचले आणि कारवाई केली. लॉकडाऊनमध्ये संचारबंदी आणि कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक आयोजनांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी सुद्धा लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून ही लोकं पार्टी करत होती.

गुन्हा दाखल केलेल्या लोकांनी मास्क घातला नव्हता किंवा सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नव्हते. काही जण स्विमिंग पूलमध्ये पोहतानाही आढळले, अशी माहिती उपनिरीक्षक विनोद पाटील यांनी दिली.  आम्ही चार बंगल्यांमधून  33 लोकांवर कारवाई केली असून काही जण यातील  शहरातील आहेत.  तर काही गुजरातचे रहिवासी आहेत, असंही त्यांनी सांगितलं. बंगल्यांच्या मालकांना त्या पार्टीबद्दल माहिती आहे का की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक नूतन पवार यांनी दिली. 

अधिक वाचा- 'साहब...हम फिरसे मुंबई नही आयेंगे', असं म्हणणारे श्रमिक पोटापाण्यासाठी पुन्हा मुंबईत येण्याच्या तयारीत
 

परिसरातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार दुपारी तब्बल 150 लोक या बंगल्यांवर आले. या भागातील व्हिला लोकं सहसा आठवड्याचे शेवटच्या दिवशी भाड्यानं देतात त्यामुळे यात काही नवीन गोष्ट नाही. मात्र लॉकडाऊन सुरु असल्यामुळे  लहान पार्ट्यांवर पोलिसांनी छापा टाकला आहे, असं स्थानिक नगरसेवक उज्ज्वल मोडल यांनी म्हटलं. लॉकडाऊन असूनही, इतके लोक या भागात कसे काय प्रवेश करू शकले याबद्दल आश्चर्य वाटतं असल्याचंही मोडल म्हणाले.

Police raided weekend parties Aarey Colony book 33 people


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police raided weekend parties Aarey Colony book 33 people