esakal | राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करण्यात मग्न ; जनतेला भोगावा लागला त्रास
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करण्यात मग्न ; जनतेला भोगावा लागला त्रास

राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करण्यात मग्न ; जनतेला भोगावा लागला त्रास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आयकर खात्याला एक हजार कोटींच्या दलालीचे पुरावे सापडल्याने या प्रश्नावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी महाराष्ट्र बंद चे हीन राजकारण महाविकास आघाडी सरकार खेळत असल्याची टीका राज्य भाजपचे प्रवक्त केशव उपाध्ये यांनी केली. तर लखीमपूर प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजिनामा द्यावी, अशी मागणी मंत्री नबाब मलिक यांनी केली.

बंद च्या निमित्ताने आज राजकीय पक्ष कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केलीच, पण त्यांच्या नेत्यांमध्येही शाब्दिक युद्ध झडले. आजच्या बंद च्या निमित्ताने हुतात्मा चौकात शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ आंदोलन करताना नवाब मलिक यांनी बंद ला विरोध करणाऱ्या मनसेवरही हल्ला चढविला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी व योगी सरकारच्या निषेधार्थ घोषणाही दिल्या.

अतिवृष्टी, महापूर, वादळे यामुळे संकटात सापडलेला शेतकरी राज्याच्या मदतीची वाट पहात असताना महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा डाव आखत आहे. आयकर खात्याला एक हजार 50 कोटी रुपयांच्या दलालीचे पुरावे सापडल्याने लखीमपूर प्रकरणाच्या आडून महाविकास आघाडी सरकारने हा बंद पुकारला आहे. दलालीच्या प्रश्नावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे हे हीन राजकारण आहे. लखीमपूरसंदर्भात जरुर चर्चा करून पण इथल्या शेतकऱ्यांना कधी मदत देणार हे राज्य सरकारने सांगावे, असा टोला उपाध्ये यांनी ट्वीटद्वारे लगावला.

तर मविआने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद' ला विरोध करुन मनसे शेतकरी हत्येला पाठिंबा देत आहे का असा प्रश्नही मलिक यांनी उपस्थित केला. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांवर गाडी घालणाऱ्या केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक करण्यास उशीर का होत आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

बंदला राज्यातील जनतेने चांगला पाठिंबा दिला. शिवाय राज्यातील व्यापारी व कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्याने सांघिक बंद यशस्वी झाल्याचे नवाब मलिक यांनी सांगतानाच सर्व व्यापारी संघटनांचे आभार मानले. विनाकारण कोणालाही त्रास होऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारची असल्याने हिंसेचे समर्थन होणार नाही. शांततापूर्वक पद्धतीने हे आंदोलन होईल, असेही मलिक यांनी सकाळीच जाहीर केले होते.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारी यंत्रणा वापरून जनतेवर दडपण आणले व आधीच जनतेला घाबरवून सक्तीने व्यवहार बंद पाडले, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर, आशीष शेलार आदींनी केली.

हेही वाचा: इगतपुरीतील भातशेतीला यंदा ग्रहण; सततच्या पावसाने मोठे नुकसान

महिला सुरक्षेसाठी ताकद लावा

आज जेवढी ताकद लावून हे सरकार राज्यातल्या जनतेला बंद पाळायला भाग पाडत आहे, त्याच्या निम्मी ताकद जरी राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी लावली असती तरी महाराष्ट्रातील महिला सुरक्षित झाल्या असत्या, असा टोला भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्वीटद्वारे लगावला.

पटोले यांचे मौनव्रत

राज्य काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दुपारी राजभवनासमोर जाऊन तेथे कार्यकर्त्यांसह मौनव्रत आंदोलन केले. यावेळी कोणीही बोलले नाहीत तर फक्त भजनांचे सूर ऐकू येत होते. पटोले यांच्यासह यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे मंत्री, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष भाई जगताप, नसीम खान, भालचंद्र मुणगेकर आदींनी दंडाला काळ्या फीती लावून, मोबाईल दूरध्वनीही बाजूला ठेऊन मौनव्रत आंदोलन केले.

loading image
go to top