भाजपचे रायगड जिल्ह्यात सूडबुद्धीचे राजकारण 

महेंद्र दुसार
Saturday, 31 October 2020

मागील काही दिवसांपासून पेण नगरपालिका मुख्याधिकारी विरुद्ध सत्ताधारी असा वाद विकोपाला गेला आहे. यामध्ये भाजपची नेतेमंडळी काहीही कारण नसताना तटकरे कुटुंबीयांवर सातत्याने आरोप करून बदनामी करीत आहेत. हे सूडबुद्धीचे राजकारण आहे, असा आरोपही लाड यांनी

अलिबाग : खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांना बदनाम करण्याचे भाजपचे कारस्थान सहन केले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी पेण येथे दिला. मागील काही दिवसांपासून पेण नगरपालिका मुख्याधिकारी विरुद्ध सत्ताधारी असा वाद विकोपाला गेला आहे. यामध्ये भाजपची नेतेमंडळी काहीही कारण नसताना तटकरे कुटुंबीयांवर सातत्याने आरोप करून बदनामी करीत आहेत. हे सूडबुद्धीचे राजकारण आहे, असा आरोपही लाड यांनी केला. 

हे वाचा : नवी मुंबईत लसीसाठी तयारी सुरू

राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी शुक्रवारी ( ता.30) पेण येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी शिवसेना सल्लागार बबन पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, कॉंग्रेसचे पनवेल शहराध्यक्ष आर. सी. घरत, शिवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर, संतोष शृंगारपुरे, प्रशांत पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, माजी नगरसेवक जितेंद्र ठाकूर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दयानंद भगत, राष्ट्रवादीचे पेण शहर उपाध्यक्ष विशाल बाफना, प्रसाद देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

हे वाचा : लस आल्याशिवाय शाळा सुरू करू नयेत

लाड यांनी सांगितले की, पेणच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्या तक्रारीनुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गटनेते व मुख्याधिकारी यांच्यातील वाद न्यायप्रविष्ट आहे. या वादाचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही. महिलांशी वागताना योग्यरीत्या वागावे. माता-भगिनींचा योग्य आदर राखावा, असाही सल्ला यावेळी लाड यांनी दिला. 

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी गुरुवारी पेण येथे बेकायदा काढलेला मोर्चा व घेतलेल्या सभेविरोधात पोलिस प्रशासन कारवाई करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. देवेंद्र फडणवीस हे राज्यात मुख्यमंत्री होते, तसेच त्या वेळेला केंद्रातही भाजपची सत्ता होती. तरीही देवेंद्र फडणवीस व भाजपने पेण अर्बन बॅंकेच्या ठेवीदारांना न्याय मिळवून दिला नाही. या संदर्भात खासदार तटकरे यांनी लोकसभेत आवाज उठवून बॅंक विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे व त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. 

सत्ता गेल्याने बिनबुडाचे आरोप 
राज्यातील सत्ता हातातून गेल्याने भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हे नेते प्रकाशझोतात राहण्याकरिता महाआघाडीच्या नेत्यांवर खोटे व बिनबुडाचे आरोप करीत आहेत. महाआडीचे सरकार लवकरच पडेल अशी आरोळी ठोकतात. या भाजपच्या वैफल्यग्रस्त नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे खुले आव्हान दिले आहे, असे बबन पाटील यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics of revenge in Raigad district: Suresh Lad