सिडकोने एक हजार खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारावे; प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

prashnat thakur and ccc
prashnat thakur and ccc

नवी मुंबई : पनवेल व उरण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. अनेक रुग्णालये भरली आहे वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांना वेळेवर आणि पुरसे उपचार मिळावे, याहेतूने  कोरोनाबाधीत रूग्णांसाठी सिडकोच्या माध्यमातून सरकारने तातडीने किमान एक हजार बेडचे सुसज्ज रूग्णालय उभारावे अशी मागणी पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाकूर यांनी मागणी केली आहे. कोव्हिड रुग्णालय उभारण्याबाबत ठाकूर यांनी निवेदनही दिले आहे. 

पनवेल, उरण तसेच नवी मुंबईतील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकोमार्फत निरनिराळ्या प्रकल्पासाठी अगदी तुटपुंज्या दरात संपादित केलेल्या आहेत. त्याबदल्यात सिडकोला प्रचंड फायदा झाला आहे. सद्यस्थितीत सिडकोचे पनवेल व उरण तालुक्यामध्ये मोठी गुंतवणूक असलेले विकास प्रकल्प सुरू आहेत . ज्या पनवेल व उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींवरील प्रकल्पांवर सिडको नावारूपाला आली त्या दोन्ही तालुक्याच्या हद्दीतील कोरोना रूग्णांना आरोग्य सेवा पुरवणे सिडकोचे प्रथम कर्तव्य आहे. 

मात्र असे असतानाही सिडकोने मुलुंड येथे उभारलेल्या 1200 खाटांच्या कोव्हिड रूग्णालयाला अर्थसहाय्य केले आहे. त्याच धर्तीवरती पनवेल व उरण तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांसाठी किमान एक हजार बेडचे कोविड रूग्णालय तातडीने उभे करणे गरजेचे आहे. याखेरीज पनवेल व उरण तालुक्यातील मोठया क्षमतेच्या रुग्णालयांना आवश्यक ते वैद्यकिय साहित्य पुरविण्यास सिडकोने पुढाकार घेतल्यास अशा हॉस्पीटलबरोबर करार करून सिडको अथवा प्रशासनाने नागरिकांना विनामूल्य अथवा रास्त दरात कोरोनावरील उपचारासाठी मदत मिळवून देवू शकते, असेही ठाकूर यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

पनवेल आणि उरण भागात कोरोना रुग्णांना दिलासा देणारे एकही मोठे रुग्णालय उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत नागरीकांचा असंतोष उफाळून येऊ शकतो. त्यामुळे रुग्णालय उभारण्याबाबत ठाकूर यांनी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनाही मागणी केली आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com