उपचारांसोबत मानसिक आरोग्याची ही काळजी; सेंट जॉर्ज रुग्णालयात डॉक्टरांकडून समुपदेशन...

भाग्यश्री भुवड
Monday, 13 July 2020

सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करता करता त्यांचे समुपदेशन ही करत आहेत. रुग्णांचा मानसिक ताण कमी व्हावा यासाठी रुग्णालयात दोन प्रकारच्या थेरेपी दिल्या जात आहेत. एक म्हणजे त्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांचे निराकारण केले जात आहे

मुंबई : मला कोरोना झाला आहे, कुटुंबापासून दूर आहे, मी बरा होईन ना? मी सर्व काळजी घेतली होती, तरी कसा कोरोना झाला? असे अनेक प्रश्न आणि भीती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना पडत आहे. त्यांच्यात एक पॅनिक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांची हीच भीती मनातून कायम स्वरुपी काढण्यासाठी सीएसएमटी येथील सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात सध्या रुग्णांना समुपदेशन देण्याचे आणि त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम सुरू आहे. 

मुख्यमंत्र्यांनी 'या' गोष्टीत बदल करायला हवा, स्वतः पवारांनी केला खुलासा

सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करता करता त्यांचे समुपदेशन ही करत आहेत. रुग्णांचा मानसिक ताण कमी व्हावा यासाठी रुग्णालयात दोन प्रकारच्या थेरेपी दिल्या जात आहेत. एक म्हणजे त्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांचे निराकारण केले जात आहे आणि दुसरं म्हणजे काही सकारात्मक व्हिडीओ दाखवून किंवा जनजागृतीपर माहिती देऊन त्यांच्या मनात विश्वास निर्माण केला जात आहे. 

सेंट जॉर्ज हे पूर्णपणे कोव्हिड रुग्णालय असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून जे.जे. रुग्णालयातील 12 मानसोपचार तज्ञ दररोज सकाळी आणि दुपारी अशा दोन वेळेस या रुग्णांना समुपदेशनाचे धडे देत आहेत. तब्बल 6 ते 8 तास पीपीई कीट्स घालून काम करणारे हे डॉक्टर्स या परिस्थितीतही रुग्णांचे मनोधैर्य वाढवायला पुढाकार घेत आहेत.  कुटुंबापासून दूर, कोरोनाची भीती आणि त्यातून होणारे मृत्यू या सर्वांचा जगभरातील प्रत्येकाच्या मनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक रुग्णालय आणि कोव्हिड सेंटर्समध्येही उपचारांसोबत मानसिक समुपदेशन केले जात आहे. दररोजच्या या उपक्रमामुळे डॉक्टर्स रुग्णांना होणार त्रास जाणून घेण्यात यशस्वी झाले असून रुग्णही आता समस्या डॉक्टरापर्यंत पोहोचवतात आणि मार्गदर्शन घेतात. 

विक्रोळीतील तरुणांकडून चक्क ऑनलाईन आंदोलन; वाचा काय आहे प्रकरण...

उपचारांसाठी कुटुंबापासून वेगळे झालेले रुग्ण एकाच वॉर्डमध्ये राहून एकमेकांची काळजी घेताना दिसतात. शिवाय, ग्रुपमध्ये आणि वैयक्तिक अशा दोन प्रकारे समुपदेशन केले जाते. तसेच रुग्णांचे मनोरंजन आणि त्या भीतीतून बाहेर पडण्यासाठी म्हणून म्युझिक, गेम्स, चित्रपट दाखवला जातो. त्यासाठी, वॉर्डमध्ये टिव्ही सुद्धा बसवण्यात आले आहेत. रुग्णांना कोरोनाचा त्रास कमी असून मनातील भीतीचे प्रमाण वाढत आहे. 27 मार्चपासून आतापर्यंत सेंट जॉर्ज रुग्णालयात एकूण 1,235 रुग्णांवर उपचार केले गेले. सद्यस्थितीत 190 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून 800 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. 

मुंबईजवळचा 'हा' जिल्हा ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट
 

अनेक रुग्ण रुग्णालयात दोन ते तीन आठवडे कुटुंबियांपासून वेगळे आणि एकटेच दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात अनेक प्रश्न आणि भीती निर्माण झाली आहे. ती भीती आणि चिंता कमी करण्यासाठी डॉक्टर्स सकाळी आणि दुपारी समुपदेशन आणि मनोरंजन थेरेपी देत आहे. विशेषतः कोरोनामुक्त झाल्यानंतर काय करायचे आणि कसे जगायचे यावर डॉक्टर्स मार्गदर्शन आणि समुपदेशन करतात. 
- डॉ. आकाश खोब्रागडे, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय

---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctors in st. george hospitals make counsalation of covid patients