मराठी चित्रपटसृष्टी येतेय हळूहळू पूर्वपदावर; टिझर लॉंचिंगसह चित्रीकरणाला सुरुवात...

संतोष भिंगार्डे
सोमवार, 13 जुलै 2020

दिग्दर्शक गजेंद्र अहिरेने अनलॉकच्या काळात एका चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे आणि दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला त्याने सुरुवात केली आहे.

मुंबई : लॉकडाऊनंतर अनलॉकचा दुसरा टप्पा सुरू आहे. हळूहळू काही ठिकाणी व्यवहार सुरू होत आहेत तर काही ठिकाणी लॉकडाऊन वाढविण्यात येत आहे. सरकारने काही नियम व अटी घालून परवानगी दिल्यानुसार टीव्ही मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले आहे. आता मराठी चित्रपटांचेही चित्रीकरण हळूहळू वेग घेणार आहे. काही मराठी चित्रपटांचे टीझर तसेच पोस्टर सोशल मीडियावर लाँच केले जात आहेत तर काही चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. दिग्दर्शक गजेंद्र अहिरेने अनलॉकमध्ये एक चित्रपट पूर्ण केला असून दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग देखील सुरू केले आहे.  

मुख्यमंत्र्यांनी 'या' गोष्टीत बदल करायला हवा, स्वतः पवारांनी केला खुलासा

अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेने आपल्या 'मनाचे श्लोक' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. पुष्कर जोगच्या 'वेल डन बेबी' या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्मिती करताना आरमाराची मुहुर्तमेढ रोवली त्या मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावर 'कान्होजी आंग्रे' हा चित्रपट येणार आहे. त्याची घोषणा दिग्दर्शक राहुल जाधवने केली आहे. पुढील वर्षी चित्रीकरण होणार आहे. 'फत्तेशिकस्त', 'फर्जंद' या सारखे चित्रपट बनविणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर 'जंगजौहर' हा चित्रपट घेऊन येत आहे. त्याची पहिली झलक त्याने आज लाँच केली. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाचा हा थरार या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर यांच्यासह अनेक कलाकार या चित्रपटात काम करीत आहे. 

विक्रोळीतील तरुणांकडून चक्क ऑनलाईन आंदोलन; वाचा काय आहे प्रकरण...

दिग्दर्शक गजेंद्र अहिरेने अनलॉकच्या काळात एका चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे आणि दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला त्याने सुरुवात केली आहे. पहिल्या चित्रपटात नवोदित कलाकार आहेत आणि ती एक लव्हस्टोरी आहे. तसेच दुसऱ्या चित्रपटाचे नाव 'विद्यापीठ' असे आहे. या चित्रपटात अभिनेत्री अंजली पाटील, अभिनेता कैलास वाघमारे आदी कलाकार काम करीत आहेत. या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण नगर येथील काही गावांमध्ये झाले आहे. 

उपचारांसोबत मानसिक आरोग्याची ही काळजी; सेंट जॉर्ज रुग्णालयात डॉक्टरांकडून समुपदेशन...​

याबाबत गजेंद्र अहिरे सांगतो, की आम्ही नगरमधील आजूबाजूच्या गावांमध्ये चित्रीकरण केले आहे आणि आताही दुसऱ्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. 'विद्यापीठ' असे त्या चित्रपटाचे नाव आहे. चित्रीकरण पूर्ण झालेल्या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. लवकरच ते आम्ही जाहीर करणार आहोत. आम्ही येथे अनलॉकच्या वेळी आलो आणि क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर चित्रीकरणाला सुरुवात केली. येथील गावकऱ्यांनी आम्हाला खूप चांगले सहकार्य केले. सरकारी नियमानुसरच चित्रीकरण करीत आहोत. आम्हाला कसलीही भीती वगैरे वाटत नाही. उलट आनंदी वातावरणात काम होत आहे. 
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi film industry resumes slowly with launching of new teasers and posters