बापरे! कोरोना उपचारासाठी खासगी रुग्णालयाचे बिल तब्बल 1 लाख रुपये...

बापरे! कोरोना उपचारासाठी खासगी रुग्णालयाचे बिल तब्बल 1 लाख रुपये...
Updated on


ठाणे ः कोविड 19 वरील उपचारासाठी नियुक्त करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा बीले आकारली जात असल्याचा आरोप होत होता. त्यामुळे या हाॅस्पिटलच्या बिलावर नियंत्रण आणण्याची मागणी सामाजिक संस्थासह लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार महापालिकेने खासगी हाॅस्पिटलसाठी दरनिश्चिती केली आहे, पण पालिकेच्या मध्यस्थीनंतर तयार करण्यात आलेले दरही सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रुग्णालयातील सामान्य, शेअरींग, स्वतंत्र आणि अतिदक्षता विभागासाठी प्रतिदिन दर निश्चित करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे करोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी आता दरदिवशी सुमारे चार ते दहा हजार रुपये इतका खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णाला 14 ते 18 दिवस रुग्णालयात रहावे लागल्यास त्याला किमान एक लाख रुपये बिल भरावे लागणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या दरपत्रकावर विचार करण्याचे आवाहन सामाजिक संस्थासह लोकप्रतिनिधींनी केले आहे.
ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी गुरूवारी रुग्णालय प्रतिनिधी, आयएमए संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन त्यामध्ये खासगी कोवीड रुग्णालयात उपचाराचे दरपत्रक निश्चित केले. त्यानुसार जनरल वॉर्डमध्ये उपचारासाठी रुग्णाकडून प्रतिदिन चार हजार रुपये आकारले जाणार आहे. त्यात बेड चार्जेस, डॉक्टर तपासणी शुल्क, पीपीई किट आणि जेवणाचा खर्च यांचा समावेश आहे. शेअरींग कक्षातील उपचारासाठी प्रतिदिन पाच हजार, तर स्वतंत्र कक्षातील उपचारासाठी प्रतिदिन सात हजार रुपये आकरले जाणार आहेत. त्यात रुग्ण खोली, डॉक्टर तपासणी शुल्क, पीपीई किट आणि जेवणाचा खर्च यांचा समावेश आहे. तर अतिदक्षता विभागासाठी प्रतिदिन दहा हजार रुपये आकारले जाणार असून व्हेंटीलेटरसाठी अतिरिक्त प्रतिदिन दोन हजार रुपये आकारले जाणार आहेत. या वेळी रुग्णांसाठी प्रत्यक्ष वापरात आलेली औषधे आणि सर्जिकल साहित्याचा खर्च यामध्ये बाजारभावापेक्षा 15 टक्के कमी दराने आकारणी करण्यात येणार आहे. याशिवाय, इन्शुअर्ड रुग्ण तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. अशा रुग्णांकडून नेहमीच्या दराने उपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्प्ष्ट करण्यात आले आहे.

गरिब रुग्णांना दिलासा 
घोडबंदर रोड येथील होरायझन प्राईम हॉस्पिटलमध्ये पिवळे आणि केशरी रेशनकार्डधारक व मध्यम उत्पन्न गटातील कोव्हीड बाधित रूग्णांवर राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार सुविधा आजपासून सुरू करण्यात आली असल्याने आता कोव्हीड बाधित गरीब रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. पिवळे, केशरी रेशनकार्डधारक व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना या रूग्णालयामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत मोफत उपचार मिळणार आहेत. या योजनेंतर्गत उच्च प्रतीचे उपचार, अत्याधुनिक सुविधा व पौष्टिक जेवण रूग्णांना विनामूल्य उपलब्ध देण्यात मिळणार आहे. संपर्क ः 022-68556855 आणि 86575 08101.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com