खासगी रुग्णालयांचाही विशेष ‘पोस्ट-कोविड पुनर्वसन क्लिनिक’ सुरु करण्यावर भर, परळच्या ग्लोबलचा पुढाकार

भाग्यश्री भुवड
Friday, 27 November 2020

मार्च 2020 पासून कोविड-19 या विषाणूचा संसर्ग झपाटयाने पसरला आणि मोठ्या संख्येने रूग्ण रूग्णालयात दाखल झाले होते.

मुंबई : मार्च 2020 पासून कोविड-19 या विषाणूचा संसर्ग झपाटयाने पसरला आणि मोठ्या संख्येने रूग्ण रूग्णालयात दाखल झाले होते. या आजारातून बरे होऊन घरी परतल्यानंतर अनेक जणांना विविध शारीरिक व मानसिक विकारांचा सामना करावा लागत आहेत. हे लक्षात घेऊन परळ येथील ग्लोबल रूग्णालयाने कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांसाठी आता ‘पोस्ट-कोविड पुनर्वसन क्लिनिक’ सुरू केले आहे.

कोरोना हा आजार मुख्यतः श्वसनविकाराशी संबंधित आहे. कोविड-19 हा व्हायरस थेट फुफ्फुसावर घातक करत होता. परंतु, सध्या हा विषाणू शरीराच्या अन्य अवयवांवरही परिणाम करू लागला आहे. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होणं आणि जळजळ होणं असा त्रास वाढतोय. 

महत्त्वाची बातमी : २०१९ विधानसभा निकालांनंतर राष्ट्रवादीचे बडे नेते शरद पवारांचा मेसेज घेऊन वर्षावर गेले होते ? नवाब मलिकांनी दिलं उत्तर

उच्च रक्तदाबानं पिडित असणाऱ्या मुंबईतील 58 वर्षीय एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खूपच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या रूग्णाला टॉसिलीझुमब, कॉन्व्हल्सेन्ट प्लाझ्मा आणि अँटीवायरल थेरपीच्या स्वरूपात इम्युनोसप्रेशन औषधोपचारसुरू करण्यात आले होते. वैद्यकीय चाचणीत या रूग्णाचे रक्त गोठत असल्याचे निदर्शनास आले. अशा स्थितीत रूग्णाला रक्तपातळ करण्यासाठी इंजेक्शनचा डोस देण्यात आला होता. साधारणतः ६० दिवस अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. चालताना अडचण जाणवत असल्याने त्यांना फिजिओथेरपी देण्यात आली होती. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर रूग्णाला घरी सोडण्यात आले.

घरी गेल्यानंतरही रूग्ण व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे डॉक्टरांच्या सतत संपर्कात होता. त्याने घरी औषधोपचार, ऑक्सिजन आणि फिजिओथेरपी चालू ठेवली होती. यामुळे हळुहळु त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे.

महत्त्वाची बातमी :"दिशा सालियानच्या मृत्यूची CBI चौकशी करावी"; मुंबई उच्च न्यालयाने याचिका फेटाळली

परळ येथील ग्लोबल रूग्णालयातील कन्सल्टंट इंटेन्सिव्हिस्ट आणि छातीरोग तज्ज्ञ डॉ. हरीश चाफले यांनी सांगितले की, "सार्स-कोविड-2 हा विषाणू थेट फुफ्फुसावर हल्ला चढवतो. पण आता कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांमध्येही काही महिन्यांनंतर थकवा जाणवणं, खोकला व सर्दी, श्वसन घेण्यास अडचण येणं अशा तक्रारी दिसून येत आहेत. त्यामुळे फुफ्फुसातील फायब्रोसिसची लक्षणं दिसल्यास त्वरीत उपचार घेणं गरजेचं आहे. 50 पेक्षा जास्त वय आणि श्वसनाचे विकार असणाऱ्या रूग्णांना यामुळे अधिक त्रास होऊ शकतो. फुफ्फुसातील फायब्रोसिस असणाऱ्या रुग्णाला दर दोन महिन्यांनी वैद्यकीय तपासणी करून घेणं आवश्यक आहे.”

डॉ. चाफले म्हणाले की, "कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांसाठी हे क्लिनिक एक वरदान आहे. कोविडमधून बरे झालेल्या अनेक रूग्णांमध्ये थकवा, ताप, डोकेदुखी, कोरडा खोकला आणि छातीत दुखणे अशी लक्षणं दिसून येत आहेत. याशिवाय स्नायू दुखणे, अशक्तपणा, पुरळ उठणे, तीव्र श्वसन त्रास सिंड्रोम (एआरडीएस), न्यूमोनिया, चिंता, नैराश्य, मेंदू धुके आणि पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर अशा त्रासही अनेक लोकांमध्ये पाहायला मिळतोय. अशा रूग्णांना मदत करण्यासाठी हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.”

महत्त्वाची बातमी : काय सांगता ? शिवसेना आणि भाजप आलेत एकत्र आणि प्रस्तावही झाला मान्य, काँग्रेसचा सभात्याग; कोणता होता हा प्रस्ताव?

( संपादन - सुमित बागुल )

private hospitals are also focusing on starting post covid therapy centers for patients


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: private hospitals are also focusing on starting post covid therapy centers for patients