प्रियांका चतुर्वेदींच्या उमेदवारीमुळे शिवसेनेत नाराजीनाट्य!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने औरंगाबादचे माजी उपमहापौर डॉ. भागवत कराड यांना तिसरे उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर केली, तर शिवसेनेने प्रियांका चतुर्वेदी यांना संधी दिल्याने मराठवाड्यातील नेते चंद्रकांत खैरे नाराज झाले आहेत.

मुंबई : राज्यसभेच्या सात रिक्त जागांसाठी बिनविरोध निवडणूक होण्याची चिन्हे असून आज काँग्रेस, शिवसेना व भाजपने प्रत्येकी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने औरंगाबादचे माजी उपमहापौर डॉ. भागवत कराड यांना तिसरे उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर केली, तर शिवसेनेने प्रियांका चतुर्वेदी यांना संधी दिल्याने मराठवाड्यातील नेते चंद्रकांत खैरे नाराज झाले आहेत.

ही बातमी वाचली का? यशस्वी उपचारानंतरही कुटुंबीय त्यांना स्वीकारत नाहीये! 

काँग्रेसने मात्र राजीव सातव यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. चौथ्या जागेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच असल्याने या चौथ्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. येत्या २६ मार्चला राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर गुरुवारी भाजपचे उमेदवार, साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपने तिसऱ्या जागेसाठी औरंगाबादचे माजी उपमहापौर डॉ. भागवत कराड यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे व शिवाजीराव आढळराव पाटील इच्छुक होते. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने खैरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

ही बातमी वाचली का? पीएमसी बॅंक गैरव्यवहार प्रकरणी माजी संचालकासह तिघांना अटक

खैरेंची खंत
प्रियांका चतुर्वेदी यांचे काम दिसले. मात्र, आमचे काम दिसले नाही. असे असले तरी स्मशानात जाईपर्यंत मी शिवसेनेत असणार आहे, असे खैरे म्हणाले. प्रियांका चतुर्वेदी चांगले काम करत आहेत. त्या हिंदी, इंग्रजीही बोलतात. मी २० वर्षे लोकसभा गाजवली. मला नव्हे तर माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती, असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या चौथ्या जागेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच असल्याने चौथ्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नसले, तरी चौथी जागा मिळावी, यासाठी दोन्ही काँग्रेस प्रयत्नशील आहेत.

ही बातमी वाचली का? ठाण्यात आरोपीच करत होता सुरक्षा रक्षकाचे काम

मला राज्याच्या राजकारणातच रस : खडसे 
राज्यसभेसाठी भाजपकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, भाजपने डॉ. कराड यांना संधी दिली. त्यावर बोलताना खडसे म्हणाले की, मला आनंद आहे की आमच्या प्रदेशाध्यक्षांची इच्छा होती की मी राज्यसभेत जावे. पण, मला ते अपेक्षित नव्हते. मी नेहमी राज्याच्या राजकारणात सक्रिय होतो आणि यापुढेही राज्यातच सक्रिय राहण्याचा माझा मानस आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka Chaturvedi's candidacy offends Shiv Sena!