esakal | मांडव्यातील मच्छीमारांचे प्रश्‍न सुटणार
sakal

बोलून बातमी शोधा

मांडव्यातील मच्छीमारांचे प्रश्‍न सुटणार

मुंबई-मांडवा रो-रो सेवेची जेट्टी, दगडी बंधाऱ्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या साधनसामग्रीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. मांडवा गावानजीक असलेल्या खाडीमध्ये गाळ साचल्यानेही त्याचा फटका पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना बसत आहे. त्यातच आता रो-रो बोट सेवेच्या मार्गात मासेमारी करणाऱ्या बोटींना मज्जाव करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

मांडव्यातील मच्छीमारांचे प्रश्‍न सुटणार

sakal_logo
By
प्रमाेद जाधव

अलिबाग : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी मांडवा येथील मच्छीमार सातत्याने आंदोलन करत आहेत. आता त्यांनी अखेरचा लढा देण्यासाठी बुधवारी (ता. 28) जनआंदोलनाची हाक दिली होती. त्याची दखल घेत महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने (एमएमबी) सोमवारी एमएमबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या वेळी सैनी यांनी मच्छीमारांचे प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे जनआंदोलनाला स्थगिती देण्यात आली आहे. 

हे वाचा : मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी होणारी सुनावणी मान्य नाही 

मुंबई-मांडवा रो-रो सेवेची जेट्टी, दगडी बंधाऱ्यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या साधनसामग्रीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. मांडवा गावानजीक असलेल्या खाडीमध्ये गाळ साचल्यानेही त्याचा फटका पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना बसत आहे. त्यातच आता रो-रो बोट सेवेच्या मार्गात मासेमारी करणाऱ्या बोटींना मज्जाव करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या मच्छीमारांनी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने 19 ऑक्‍टोबरला मुख्यमंत्री, बंदर विकास आणि मत्स्योद्योग मंत्री, जिल्हाधिकारी, मेरीटाइम बोर्ड, पोलिस अधीक्षक आदींना निवेदन देऊन मच्छीमारांवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून दिली. या मागण्यांसाठी मांडवा बंदरावर बोटी अडवून जनआंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा दिला होता. 


हे वाचा: जैन मुनींच्या आशीर्वादाने भगवा फडकणार; गीता जैन यांचा विश्वास

मच्छीमारांच्या या लढ्याची दखल घेत अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये दिलीप भोईर, माता टाकादेवी मच्छीमार सहकारी सोसायटीचे पदाधिकारी अनिल भिंगारकर, नयन नाखवा, राजेंद्र कोळी, मत्स्य विभागाचे प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे, मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन, सतीश शर्मा, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे प्रकाश चव्हाण, कार्यकारी अभियंता सुधीर देवरे, अलीबागच्या उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, रायगड पोलिस दलातील प्रतिनिधी पोलिस उपनिरीक्षक विश्‍वनाथ तोडकरी, मांडवा सागरी पोलिस ठाण्याचे प्रतिनिधी सुधीर पाटील आदी उपस्थित होते. 

महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी आणि मांडवा बंदरातील मच्छीमारांमध्ये समस्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. मांडवा येथील गट क्रमांक 312 हे क्षेत्र मच्छीमारांच्या परंपरागत व्यवसायासाठी राखीव ठेवणे, त्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, बंदर विभागात विकासकामे करताना स्थानिकांना विश्‍वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने काम करणे आदीबाबत सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला, असे जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी सांगितले. 

मांडवा परिसरातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत गेल्या 12 वर्षांपासून लढा देत आहोत, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने या लढ्याला सुरुवात केल्याने अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून सकारात्मक चर्चेतून लढ्याला न्याय मिळाला आहे. 
- नयन नाखवा, सेक्रेटरी, माता टाकादेवी मच्छीमार सहकारी सोसायटी- मांडवा 

 

loading image