तेल गेले तूप गेले... हाती आले धुपाटणे! मुंबईतील चाकरमान्यांची बिकट अवस्था...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

  • लॉकडाऊनच्या काळात मुंबई व अन्य ठिकाणाहून गावी परतलेल्या चाकरमान्यांपुढे आता उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • गावी असणारी शेत जमीन व इतर मालमत्ता विकून टाकल्याने शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नालाही मुंबईतून नोकरी सोडून आलेल्या चाकरमान्यांना मुकावे लागले आहे.  

महाड : लॉकडाऊनच्या काळात मुंबई व अन्य ठिकाणाहून गावी परतलेल्या चाकरमान्यांपुढे आता उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गावी असणारी शेत जमीन व इतर मालमत्ता विकून टाकल्याने शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नालाही मुंबईतून नोकरी सोडून आलेल्या चाकरमान्यांना मुकावे लागले आहे. त्यामुळे नोकरी सोडली अन् शेती गमावली अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

ही बातमी वाचली का? 'लालबागच्या राजा'चा गणेशोत्सव रद्द, मंडळ जपणार सामाजिक भान 

कोकणातील ग्रामीण भागामध्ये असणारा चाकरमानी मुंबईमध्ये नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झाला आहे. तसेच पुणे, सुरत या भागातही येथील चाकरमानी वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. अनेक चाकरमानी मुंबईहून पायी चालत गावी कसेबसे परतले. परंतु आता या चाकरमान्यांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 

ही बातमी वाचली का? ठाणेकरांनो! उद्यापासून असा असेल 'लॉकडाऊन', प्रशासनाकडून 'नियमावली' जाहीर

रायगड जिल्ह्यात एक लाखाहून अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत. दक्षिण रायगडमध्ये चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. महाड तालुक्यात तब्बल अकरा हजार चाकरमानी परत आले. या सर्वांना आता उपजिविकेचा प्रश्न भेडसावत आहे. यापूर्वी गावी असणारी शेती व इतर मालमत्ता ही उपजिविकेचे साधन होते; मात्र अनेकांनी आपल्या जमिनी विकून टाकल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे शेती करण्यासाठी तसेच इतर उत्पन्न घेण्यासाठी जमीन शिल्लक नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही अपवादात्मक चाकरमान्यांकडे जमीन शिल्लक होती. त्यांनी या काळात शेती व भाजीपाल्याचे प्रयोग केले. परंतु ही संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. मुंबईतील रोजगार गेला आहे व गावाकडे शेती नाही अशा परिस्थितीत चाकरमानी सापडलेला आहे. त्यामुळे मुंबईतील परिस्थिती पूर्वपदावर येण्याची वाट अनेक चाकरमानी पाहत आहेत. 

ही बातमी वाचली का? खाकी वर्दीची तत्परता ! एक ट्विट अन् 'त्या' व्यक्तीच्या मदतीसाठी पोलिस धावून गेले

गावी वडिलोपार्जित असणारी शेती पावसाळा असल्यामुळे विकून टाकली. आज या शेतीचे महत्त्व कळत आहे. शेती नसल्याने आम्हाला आता मुंबईचे जनजीवन कधी सुरू होईल याची वाट पाहावी लागत आहे. 
- ज्ञानेश्वर कदम, चाकरमानी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: quit job and lost own land kokan The plight of employees in Mumbai