पैसे देणार नाही... मागण्यासाठी येऊ नका! ठेवीदारांची न्यायालयात धाव

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 February 2020

वृद्ध दाम्पत्याने विश्वासाने तीन वर्षांसाठी मुदत ठेव म्हणून तारकेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवलेली तब्बल ९ लाख रुपयांची रक्कम पतसंस्थेने वृद्ध दाम्पत्याला परत न करता, या रकमेचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नवी मुंबई : वृद्ध दाम्पत्याने विश्वासाने तीन वर्षांसाठी मुदत ठेव म्हणून तारकेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवलेली तब्बल ९ लाख रुपयांची रक्कम पतसंस्थेने वृद्ध दाम्पत्याला परत न करता, या रकमेचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. रबाळे पोलिसांनी या पतसंस्थेच्या तत्कालीन अध्यक्षावर फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

ही बातमी वाचली का? खुशखबर... निटको कामगारांना मोबदला मिळणार

वृद्ध दाम्पत्याचे नाव गीताबाई गायकर आणि दगडू गायकर असे असून, ते घणसोलीतील सिम्प्लेक्‍स वसाहतीत राहण्यास आहेत. सहा वर्षांपूर्वी या वृद्ध दाम्पत्याने घणसोली येथील आपल्या मालकीचा फ्लॅट विकला होता. या रकमेतून त्यांनी गावी घर विकत घेतले होते; तर त्यातील काही रक्कम शिल्लक होती. या वेळी तारकेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचा तत्कालीन अध्यक्ष अरुण लक्ष्मण निकम याने या वृद्ध दाम्पत्याची भेट घेतली होती. त्यांची ९ लाख रुपयांची रक्कम पतसंस्थेमध्ये ३ वर्षांसाठी ठेव म्हणून ठेवल्यास त्यांना महिन्याला ९ हजार रुपये व्याज देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे या वृद्ध दाम्पत्याने निकम याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून, त्याच्या पतसंस्थेमध्ये ९ लाख रुपये तीन वर्षांसाठी मुदत ठेव म्हणून ठेवले. 

ही बातमी वाचली का? येथे मराठी माणसाला नोकरी मिळणार नाही

त्यानंतर निकम याने वृद्ध दाम्पत्याला सुरुवातीची दीड वर्ष प्रत्येक महिन्याला ९ हजार रुपये व्याज दिले. मात्र, नंतर त्याने या दाम्पत्याला व्याज देणे बंद करून त्यांना व्याज देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या दाम्पत्याने त्याच्याकडे आपली रक्कम परत मागितली. त्यामुळे निकम याने ४ लाख रुपये तत्काळ देण्याचे व उर्वरित रक्कम थोडे-थोडे करून देण्याचे आश्वासन देऊन नोटरीवर लिहून दिले. मात्र, त्यानंतरही वृद्ध दाम्पत्याला आपली रक्कम मिळाली नाही. 

ही बातमी वाचली का? मनसेच्या महामोर्चाला भाजपचा पाठिंबा?

न्यायालयाचे आदेश
वृद्ध दाम्पत्याने याबाबत विचारणा केली असता, अरुण निकम याने या वृद्ध दाम्पत्याला पैसे देऊ शकत नसल्याचे सांगून, माझ्याकडे पुन्हा पैसे मागण्यासाठी येऊ नका, असे सांगत धमकी दिली. या वृद्ध दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. रबाळे पोलिसांनी तारकेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचा तत्कालीन अध्यक्ष अरुण निकम याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rabala cheating on elderly couple Abduction of 9 lakhs rupees

Tags
टॉपिकस