
अलिबाग : राज्य आणि मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्क्यांपेक्षा कमी असताना रायगड जिल्ह्यात सकारात्मक चित्र दिसत आहे. या जिल्ह्यातील 44 हजार 307 रुग्णांनी मात केली आहे. ही टक्केवारी तब्बल 89.85 इतकी आहे. विशेष म्हणजे सप्टेंबरच्या मध्यावर रुग्ण संख्या वाढ हा चिंतेचा विषय असताना आता हा आलेख हळूहळू खाली येत आहे; परंतु चिंता अजूनही कमी झालेली नाही. नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
रायगड जिल्ह्यात 49 हजार 299 कोरोनाबाधित आढळले आहेत. यातील 44 हजार 307 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील कोरोना क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर गेलेल्या रायगड जिल्ह्याचा आता नागपूरनंतर सहावा क्रमांक आहे. 15 सप्टेंबरला जिल्ह्यात रुग्णांची सर्वात जास्त 6 हजार 314 इतकी संख्या झाली होती. त्यानंतर या आकडेवारीत सातत्याने घसरण होत आता केवळ 3 हजार 597 इतके ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. सर्व व्यवहार सुरळीत होत असताना नागरिकांनी सावधानता पाळणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नागरिकांना मास्क लावण्याची सक्ती असून गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना थांबवत पोलिसांची कारवाई सुरूच आहे. आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृतीसाठी ठिकठिकाणी फलक लावून सर्तक राहण्याच्या सूचना केल्या जात आहेत. "माझे आरोग्य माझी जबाबदारी' मोहिमेतून संशयित रुग्णांचा शोध सुरू असून कोरोनाविरोधात लढा सुरूच ठेवण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाचे दिसून येत आहेत.
पुरेसा ऑक्सिजन साठा
15 दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. या विरोधात प्रसिद्धी माध्यमांतून आवाज उठवल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अलिबाग जिल्हा रुग्णालय आणि माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प सुरू केला आहे. आता जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याचा दावा आरोग्य विभाग करीत आहे.
कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना सुविधा कमी न करता त्या अधिक सक्षम केल्या जात आहेत. ऑक्सिजन, आवश्यक औषधे यांच्यासह कर्मचाऱ्यांची संख्या कायम ठेवली जात आहे. सर्वेक्षण मोहिमेतून मिळालेल्या माहितीनुसार संशयित रुग्णांशी संवाद साधला जात आहे.
-डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड.
*
रुग्णसंख्या कमी होत असली तरी बेसावध राहता येणार नाही. खबरदारी घेणे आवश्यक असून मास्क लावणे, सॅनिटायझरसह सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणेतील ज्या उणिवा आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड
(संपादन : नीलेश पाटील)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.