रायगडमध्ये अवकाळीचा भाताला फटका ; शेतकरी चिंतेत 

अवकाळी.
अवकाळी.

अलिबाग : गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी आनंदी होता. भात पिक तयार झाल्याने पुढील काही दिवसात कापणीला देखील सुरुवात होण्याची शक्‍यता होती. मात्र शनिवारी सायंकाळपासून पावसाने रायगड जिल्ह्यात पुन्हा बरसण्यास सुरुवात केल्याने हातातोंडाशी आलेले पीक जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. 


रविवारी सकाळ पासून ढगाळ वातावरण आहे. अशी स्थीती पुढील काही दिवस कायम राहील्यास भात पिकावर परिणाम होण्याची शक्‍यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. हवामान विभागाचा कोणताही अलर्ट नसताना शनिवारी (ता.3) सायंकाळी जिल्ह्यातील काही तालुक्‍यांमध्ये आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाळी. भातशेती लोंबीला आलेली असल्याने येथील शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पहात आहेत. लवकर तयार होणाऱ्या हलव्या जातीचे पीक पूर्ण पणे तयार झालेले आहे. कर्जत, सुधागड - पाली, माणगाव, रोहा, तळा या डोंगराळ तालुक्‍यामध्ये लवकर तयार होणारे भात पीक जास्त प्रमाणात घेतले जाते, या पिकाला यावर्षी फटका बसू शकतो. अलिबाग, पेण, उरण तालुक्‍यातील खलाटीतील भातपीक यापूर्वीच अतिपाऊस आणि वाऱ्यामुळे आडवे पडले आहे. काही दिवसातच भाताची कापणी सुरु करणे गरजेचे आहे. परंतु या साठी पाऊस थांबणे गरजेचे आहे.

 

पावसाच्या लहरीपणात कापणी करणे योग्य नाही. खाचरात पाणी साचू नये यासाठी पाण्याचे मार्ग खुले करावेत आणि वातावरण निवळण्याची वाट शेतकऱ्यांनी पहावी. 
- पांडुरंग शेळके 
अधिकारी, कृषी अधिक्षक कार्यालय 

मागील वर्षी देखील याच कालावधीत आलेल्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान केले होते. या वर्षी पडलेल्या समाधानकारक पावसाने आतापर्यंत पिकाची स्थिती उत्तम आहे. पावसाने हे पीक वाया गेले तर अधिच कोरोनामुळे त्रस्त असलेल्या या परिस्थितीत शेतकऱ्यांना जगणे कठीण जाईल. 
- सिताराम पाटील, शेतकरी, कुसुंबळे, अलिबाग 

 rice crop rain loss in raigad district

( संपादन ः रोशन मोरे)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com