एलईडीवाल्यांचे धाबे दणाणले 

कारवाई करण्यात आलेली कैवल्यमूर्ती मासेमारी नौका, नौकेवरील खलाशी आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी.
कारवाई करण्यात आलेली कैवल्यमूर्ती मासेमारी नौका, नौकेवरील खलाशी आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी.

अलिबागः बंदी घालण्यात आलेल्या एलईडी दिव्यांच्या साह्याने मासेमारी करणाऱ्या नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी केलेल्या कारवाईत सहा लाख रुपयांचे एलईडी दिवे ताब्यात घेण्यात आले आहेत. मस्त्यव्यवसाय विभागाने आतापर्यंत 12 मच्छीमार नौकांवर कारवाई करत साधारण एक कोटी रुपये किमतीचे एलईडी दिवे ताब्यात घेतले आहेत. मस्त्यव्यवसाय विभागाच्या या धडक कारवाईने एलईडी, पर्ससीन जाळ्यांद्वारे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी चांगलाच धसका घेतला आहे.


पारंपरिक मच्छीमार आणि एलईडी, पर्ससीन जाळ्यांद्वारे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांमधील संघर्ष टोकाला पोहचलेला असताना मत्स्यव्यवसाय विभागाने केलेल्या कारवाईचे पारंपरिक मच्छीमार स्वागत करीत आहेत; परंतु ही कारवाई अगदीच जुजबी असल्याने ती अधिक सक्रिय करावी, अशी मागणी पारंपरिक मच्छीमार करीत आहेत. अलिबाग बंदरातून कैवल्यमूर्ती ही नौका मासेमारीसाठी गेली होती. ती बंदरात परत येत असताना मत्स्यव्यवसाय विभागाची नौका मत्स्य प्रबोधिनी IND-MH-3-MM-4266 द्वारे ही कारवाई करण्यात आली. यामध्ये श्रीवर्धन विभागाचे परवाना अधिकारी अजित गावडे यांच्यासह उरण विभागाचे स्वप्नील दाभाणे यांच्या पथकाने मंगळवारी रात्री या मासेमारी नौकेची तपासणी केली असता या नौकेत एलईडी दिवे आढळून आले. यामध्ये पाण्याबाहेरील दोन आणि पाण्यातील दोन एलईडी दिव्यांचे युनिट आहेत. याची प्रत्येकाची किंमत किमान दीड लाख रुपयांच्या दरम्यान आहे. यासाठी अलिबाग पोलिसांनीही मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाला सहकार्य केले. अलिबाग पोलिस मुख्यालयातील पोलिस कॉन्स्टेबल ओ. एस. सोडेकर यांच्या मदतीने भरसमुद्रात पाठलाग करीत एलईडी दिवे ताब्यात घेतले.

पारंपरिक मच्छीमारांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याने मत्स्यव्यवसाय विभागाला दखल घ्यावी लागली आहे. बुधवार, गुरुवारीही मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी पोलिसांसह अलिबाग, वरसोली बंदरात हजर होते; परंतु त्यांना कोणताही मुद्देमाल ताब्यात घेता आला नाही. 

एलईडी दिव्याने मासेमारी करण्यावर बंदी आहे. असे असतानाही जे मच्छीमार मासेमारी करीत असतात त्यांच्या नौका ताब्यात घेणे शक्‍य नसते. यासाठी लाखो रुपयांच्या घरात किमती असणारे दिवे ताब्यात घेतले जातात. आतापर्यंत 12 नौकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. 
-रत्नाकर राजम 
सहायक आयुक्त, रायगड 

मत्स्यव्यवसाय विभागाकडून होत असलेली कारवाई जुजबी असून, मच्छीमारांची दिशाभूल करणारी आहे. एलईडी आणि पर्ससीन नेटद्वारे होणाऱ्या मासेमारीने 98 टक्के मच्छीमारांचे अतोनात नुकसान होत असल्याने आधुनिक तंत्राने मासेमारी करणाऱ्या 2 एलईडी मच्छीमारांवरील कारवाई अधिक सक्रिय होणे गरजेचे आहे. 
- दिलीप भोईर,
अध्यक्ष, पारंपरिक मच्छीमार संघर्ष समिती

अलिबाग ः कारवाई करण्यात आलेली कैवल्यमूर्ती मासेमारी नौका, नौकेवरील खलाशी आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com