नववर्ष शुभेच्छापत्रांकडे ग्राहकांची पाठ

संग्रहित
संग्रहित

महाड ः स्मार्ट फोनमुळे फेसबुक, व्हॉट्‌सॲप अशी रूढ झालेली आधुनिक काळातील विविध समाजमाध्यमे व त्यावरील संक्षिप्त व सुंदर भाषा आणि सहजतेने फॉरवर्ड करण्याची पद्धत यामुळे शुभेच्छा पाठविण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. त्यामुळे बाजारातील नववर्ष शुभेच्छापत्रांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. 

शुभेच्छा देण्याचे स्वरूपही बदलल्याने दुकानदारांनीही शुभेच्छापत्रे विक्रीला फारसे प्राधान्य दिलेले नाही. याआधी जिल्ह्यामध्ये २२ ते २५ हजार शुभेच्छापत्रांची विक्री होत होती. ही विक्री आता पूर्णपणे थांबली आहे. महाड तालुक्‍यात याआधी पाच हजार शुभेच्छापत्रे येत असे. हे प्रमाण आता केवळ ५०० च्या आसपास आहे.

काही वर्षांपूर्वी नववर्ष, नाताळ व दिवाळीनिमित्त आप्त-मित्रांना; तसेच इतरांना सुंदर व अलंकारिक शब्दांत शुभेच्छा देण्यासाठी बाजारात निरनिराळ्या प्रकारची शुभेच्छापत्रे असायची. त्यामुळे मराठी व इंग्रजी भाषेतील शुभेच्छापत्रांची बाजारात चलती असायची. दिवाळीच्या चार-पाच दिवस अगोदरपासून टपालाने शुभेच्छापत्रे येत असत. अनेक नामांकित कंपन्या या व्यवसायात पुढे होत्या. तरुण ग्राहकांचा याला भरघोस प्रतिसाद मिळत असे. परंतु मोबाईल व स्मार्ट फोन बाजारात आल्यानंतर हे चित्र पालटले. आजच्या स्मार्ट फोनच्या युगात शुभेच्छापत्रांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. भ्रमणध्वनींवरून पाठविण्यात येणारे संदेश, व्हॉट्‌सॲप व फेसबुकसारखी समाजमाध्यमे यासाठी कारणीभूत आहेत.

सहजतेने उपलब्ध होणारे संदेश, शुभेच्छापत्र, छायाचित्र, ध्वनी यामुळे फोनवरूनच शुभेच्छा पाठवल्या जात आहेत. शिवाय स्मार्ट फोनमुळे हव्या त्या व्यक्तीशी समोरासमोर व्हिडीओ कॉलने संपर्क होत असल्याने हल्लीच्या तरुणी-तरुणांचा शुभेच्छापत्रे घेण्याकडे कल खूपच कमी झाला आहे. काही लोकप्रतिनिधी, काही संस्था, संघटनांचे पदाधिकारी, बॅकांची शुभेच्छापत्रे पाठविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. व्यापारी, पुरवठादार, छपाई व्यावसायिक यांना मोठा फटका बसला आहे.

शुभेच्छापत्रे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या अलीकडच्या काळात फारच कमी होत आहे. त्यामुळे त्यांची विक्री बंद केली आहे. काही वर्षात शुभेच्छापत्रे कालबाह्य होतील. 
- मुबीन देशमुख, व्यापारी 

पदाधिकारी, संघटना व ग्राहक स्वत:च्या नावाचे शुभेच्छापत्र छापून घेत असत. त्यातून व्यवसायही मिळत असे. परंतु आता त्यांच्याकडूनही अजिबात मागणी येत नाही. त्यामुळे व्यवसाय मंदावला आहे. 
- उत्तम तांबडे, छपाई व्यावसायिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com