दिवेआगरमध्ये कोस्टव्हाईज महोत्सव सुरू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

जैवविविधतेचे संवर्धन व्हावे. समुद्र किनाऱ्यावरील जैवविविधतेचा अभ्यास व्हावा या हेतूने कोस्टव्हाईजद्वारे देशभरात प्रयत्न केले जातात. किनाऱ्यावरील दुर्लक्षित बाबींवर लक्ष देण्याच्या हेतूने याचे आयोजन केले जाते.

श्रीवर्धनः महाराष्ट्राचा आघाडीचा मरीन महोत्सव मानला जाणारा कोस्टव्हाईज महोत्सव दिवेआगर समुद्रकिनारी दणक्‍यात सुरू झाला आहे. महोत्सव रविवारपर्यंत (ता. 16) चालणार आहे.

दीड हजार कोटीच्या सोन्याची तस्करी
 
यंदा 8 फेब्रुवारीपासून महोत्सव सुरू झाला आहे. रविवारी (ता. 9) कांदळवन फाऊंडेशन व सेल, डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडिया व मरीन लाईफ ऑफ मुंबई यांच्या साह्याने दिवेआगर समुद्र किनारी शोर वॉक घेण्यात आला. यामध्ये पुणे, मुंबई व कोल्हापूर येथील पर्यटकांनी सहभाग घेतला. जैवविविधतेचे संवर्धन व्हावे. समुद्र किनाऱ्यावरील जैवविविधतेचा अभ्यास व्हावा या हेतूने कोस्टव्हाईजद्वारे देशभरात प्रयत्न केले जातात. किनाऱ्यावरील दुर्लक्षित बाबींवर लक्ष देण्याच्या हेतूने याचे आयोजन केले जाते. या वर्षी मुंबईबरोबरच दिवेआगर, चेन्नई, गोवा या किनाऱ्यावरही हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सागरी किनाऱ्यांवर असंख्य सागरी जीव तग धरून आहेत. इथले समुद्रकिनारे या जीवसृष्टीसाठी पोषक नसले तरीही परिस्थितीशी जुळवून घेत ते आपली वाढ करत आहेत. मानवी हस्तक्षेप, सांडपाणी, प्लास्टिक कचरा अशा विविध कारणांमुळे समुद्रकिनारा प्रदूषित होत असतो. याचा परिणाम सागरीजीवांवर होतो.
 
या वेळी कांदळवन प्रकल्प समन्वयक चैताली पाटील यांनी इंटर ताइंडल झोनमध्ये दिसून येणारे निरनिराळे शंखशिंपले, सी स्टार, शंखातील हर्मिट, जलचरांची माहिती उपस्थितांना दिली. त्याचबरोबर सहभागी पर्यटकांनी आपले अनुभव सांगून या शोर वॉकचा आनंद घेतला. या वेळी दिवेआगरचे सरपंच उदय बापट, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक शंकर मयेकर, महेश पिळणकर, ग्रामस्थ व पर्यटक उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-shreevardhan-festival