मध्य रेल्वे मार्गावरील दुरुस्तीच्या कामात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

rail work
rail work

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील सर्व विभागांमध्ये रुळ दुरुस्ती, पॉईंट बदलण्याच्या मान्सूनपूर्व कामाला वेग आला आहे. त्यासाठी रेल्वेने 100 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य केली असून, हे काम करतांना विविध ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना एकत्र आणून काम केले जात असल्याने सोशल डिस्टन्सिंग फज्जा उडताना दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची धमकीही दिली जात असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांनी नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले.

राज्यासह देशभरात एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले जात आहे. तरीही नागरिकांची गर्दी होत असल्याने दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा फैलाव वाढतच आहे. अशा परिस्थितीत मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या पाचही विभागातील रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे आणि पॉईंट बदलणे असे काम ट्रॅकमॅनच्या साह्याने केली जात आहे. या कामासाठी संबंधित विभागातील अनेक ट्रॅकमॅन कर्मचाऱ्यांचे युनिटच्या कर्मचाऱ्यांना एकत्र आणल्या जात असून युद्ध पातळीवर काम केल्या जात आहे.

रुळ दुरुस्तीच्या कामासाठी मनुष्यबळ आवश्यक असते, त्यासाठीच इतर ठिकाणाहून कर्मचाऱ्यांना बोलावण्यात येते, मात्र काम करतांना कर्मचाऱ्यांमध्ये अंतर दिसून येत नाही. कर्मचाऱ्यांना एकत्र काम करावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची भीती सुद्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे कामावर मन लागत नसल्याचे रेल्वे चे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. शिवाय रेल्वेचे काम करण्याचे साहित्य पोलादी असल्याने एकमेकांचे साहित्य सुद्धा अशा सामूहिक कामाच्या वेळी वापरल्या जात असते. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा किंवा कोरोनाचे लक्षण असल्यास, इतर कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची अधिकच शक्यता असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

रेल्वे मार्गावर सध्या मालगाड्या, श्रमिक रेल्वे सुरु आहे. अशा परिस्थितीत रेल्वे कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग बाजूलाच ठेवावे लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जर आपल्या जीवाला धोका वाटत असल्यास त्यांनी कामावर येऊ नये, त्यांच्यावर नॅशनल रेल्वे मजदुर युनियन कोणतीही कारवाई होऊ देणार नाही. त्यांनी स्वतःच मास्क, ग्लॅब्स आणि सुरक्षेच्या दृष्टीने सर्व साहित्य वापरणे आवश्यक असून सोशल डिस्टन्सिंग ठेऊन काम करायचे आहे.
- वेणू नायर, सरचिटणीस, नॅशनल रेल्वे मजदुर युनियन

याबाबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि सर्व विभागांच्या विभागीय व्यवस्थापकांशी बोलणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यासाठी निर्णय घेण्याची मागणी करणार आहे. 
- बी. के. कोईया, विभागीय अध्यक्ष, ऑल इंडिया एसी-एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन

मध्य रेल्वे कोरोनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करत आहे. सर्व अधिकारी वेळोवेळी कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासंदर्भात मार्गदर्शन करत आहे. प्रत्येक रेल्वे कर्मचाऱ्यांना अधिकारी सूचना देत आहे. त्याशिवाय सॅनिटायझर, मास्क सुद्धा रेल्वे कर्मचाऱ्यांना दिले जात आहे.  
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com