esakal | दर पंधरा दिवसांनी मंत्र्यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा करावा
sakal

बोलून बातमी शोधा

दर पंधरा दिवसांनी मंत्र्यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा करावा

दर पंधरा दिवसांनी मंत्र्यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा करावा

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : पाऊस आणि त्यामुळे रस्त्यांची झालेली वाताहातीने नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसामुळे खड्डे बुजविण्याच्या कामात अडथळा येत असल्याचे कारण पालिका प्रशासनाकडून दिले जाते. मात्र शहरात मंत्र्यांचे दौरे असले की भर पावसातही खड्डे बुजविले जातात. याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वीच नागरिकांना आला. दौरे झाल्यानंतर मात्र सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे मात्र कोणी लक्ष देत नसल्याने दर पंधरा दिवसांनी मंत्र्यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा करावा, त्यानिमित्ताने तरी नागरिकांना चांगले रस्ते मिळतील अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची पावसाळ्यात पुरती चाळण झाली आहे. या खड्ड्यातून वाहन चालविणे म्हणजे दररोज तारेवरची कसरत असते. त्यात जोरदार पाऊस असेल तर अपघाताची भीतीही मनात येत असल्याचे नागरिक सांगतात. महापालिका क्षेत्रासह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य विकास महामंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांचीही सारखीच अवस्था असून त्याचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. राजकीय पक्ष खड्डे भरो आंदोलन करून आपली पोळी भाजून घेतात. रस्त्यांच्या कामासाठी आणलेल्या निधीसाठीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत श्रेय लाटण्याचा कयास झाला. मात्र रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची जबाबदारी घेण्यास कोणी पुढे येताना दिसत नाही.

हेही वाचा: सलग चौथ्या दिवशी दिलासा; देशात सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट

पावसामुळे खड्डे बुजविण्याच्या कामात अडथळा येत असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येते. मात्र काही दिवसांपूर्वीच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा कार्यक्रमाच्या निमित्ताने डोंबिवलीत दौरा झाला. त्यावेळी मंत्री ज्या रस्त्यावरून जाणार त्या मार्गावरील खड्डे पालिका प्रशासनाने तातडीने बुजविण्याचे काम केले होते. भर पावसात, वाहतुकीची वर्दळ असतानाही लगबगीने हे काम केले जात होते. खडी आणि वाळूच्या मिश्रणाने हे खड्डे त्यावेळी तात्पुरते बुजविले गेले होते. दौरे झाले तशी या रस्त्यांकडे प्रशासनाने पाठ फिरवल्याचे दिसुन येते. गेले काही दिवस सतत पाऊस सुरू असून वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरील खड्डे अपघाताला कारण ठरत आहेत. यामुळे दर पंधरा दिवसांनी मंत्र्यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा करावा जेणेकरून शहरातील रस्ते चांगल्या अवस्थेत राहतील अशी प्रतिक्रिया जनसामान्यांतून उमटत आहे.

गणेशोत्सव सुरू असून काही लोकप्रतिनिधी विसर्जन स्थळाच्या रस्त्याचे काम केल्याचे फोटो समाज माध्यमावर पोस्ट करतात. मात्र त्या भागाबरोबरच सर्वच रस्त्यांची जबाबदारी त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी किंवा राजकीय व्यक्तींनी, पक्षाने घेऊन नागरिकांना चांगले रस्ते द्यावेत अशी मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी; DA,DR मुळे वाढला HRA

शहरातील रस्त्यांची अवस्था गेले कित्येक वर्षे खराब आहे. पावसाळ्यात या समस्या जास्त उठून दिसतात. मंत्री, अधिकारी यांचे दौरे असले, निवडणूका आल्या की रस्त्यांची डागडुजी केली जाते. जर महिन्यातून एकदा रस्त्यांची पहाणी मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी केली तर रस्ते नक्कीच चांगले राहतील.

-जितेंद्र थाळे, नागरिक

पालकमंत्री येणार म्हणून घरडा सर्कल, मानपाडा रोड, टिळकरोड येथील खड्डे बुजविले गेले होते. मात्र आता पुन्हा त्या परिसरात खड्डे पडले आहेत. एवढेच काय नव्याने बांधलेल्या कोपर पुलावर देखील खड्डे पडले आहेत. एकदाच काम करा पण ते नीट करा, टिकेल असे करा.

-चिंतामण कांबळे, नागरिक

loading image
go to top