esakal | मुंबईत बारपाठोपाठ दुकानदारांकडूनही वसुली? मनसेने ट्विट केलं 'रेट कार्ड'
sakal

बोलून बातमी शोधा

Shops-Open-Video

मुंबईत बारपाठोपाठ दुकानदारांकडूनही वसुली? मनसेनं सांगितला 'रेट'

sakal_logo
By
विराज भागवत

लॉकडाउनमध्ये चार नंतर दुकानं उघडी ठेवायची असतील तर... पाहा 'वसुली रेट कार्ड'

मुंबई: राज्यात विविध प्रश्न उभे असताना विधीमंडळाचे अधिवेशन राज्य सरकारने दोन दिवसात गुंडाळण्यात आले. विविध सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल, लॉकडाउन शिथिल करणे अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चाच झाली नाही. लॉकडाउन उठवण्याबाबत ठोस भूमिकादेखील सरकारने जाहीर केलेली नाही. पण असे असले तरी वेळेची मर्यादा संपल्यानंतरही छोट्या व्यापाऱ्यांची दुकाने सर्रास सुरू ठेवली जात असून त्यासाठी त्यांच्याकडून पैशाची वसुली केली जाते, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला आहे. (Raj Thackeray led MNS Sandeep Deshpande Allege that Mumbai BMC extorting money from shopkeepers in Mumbai Lockdown)

हेही वाचा: MUMBAI TRAIN : आता ठरलं, आंदोलनाशिवाय पर्याय नाही!

मनसेचे संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटरवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये नक्की कोणत्या वेळी हा व्हिडीओ शूट केलाय याची माहिती मिळू शकलेले नाही. पण मुंबईत सध्या तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने चारपर्यंतच उघडी ठेवण्याची परवानगी आहे. पण मनसेच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील दुकाने ही चारनंतरदेखील सर्रास उघडी ठेवली जात आहेत. बारपाठोपाठ आता दुकानदारांकडूनही वसूली केली जात असून त्याचं एक रेटकार्डही असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे. मोठ्या दुकानांकडून ५ हजार , मध्यम दुकानांकडून २ हजार तर छोट्या दुकानांमधून १ हजाराची वसूली केली जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

'आधी वसुली बार मालकांकडून... आता वसुली व्यापाऱ्यांकडून...! मुंबईत कोरोनाच्या नावावर नवीन वसुली मोहीम सुरू..... सायंकाळी चार नंतर दुकान सुरू ठेवण्यासाठी मोठे दुकान 5000, मध्यम दुकान 2000, छोटे दुकान 1000 वसुली चे नवे रेट कार्ड', असा आरोप त्यांनी केला आहे. या आरोपासोबत त्यांनी व्हिडीओदेखील ट्वीट केला आहे.

हेही वाचा: मास्क लावून जनतेची तोंडं कायमची बंद करता येणार नाहीत!

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच देशपांडे यांनी लॉकडाउनवरून सरकार आणि विरोधकांना लक्ष्य केलं होतं. केवळ विरोध दर्शवून गोष्टींची उत्तर मिळू शकत नाहीत. प्रश्नांची उत्तर मागण्यासाठी विरोधी पक्षाने जाब विचारायला हवा. लोकांच्या अनेक समस्या आहेत पण त्याबद्दल सत्ताधारी आणि विरोधक बोलले नाहीत. त्याउलट विधीमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्यानंतर विरोधकांनी बाहेर आपली वेगळी विधानसभा भरवली आणि आपले विषय पुढे रेटले. हे चुकीचे आहे, अशा आशयाचे ट्वीट करत देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. "वाद - प्रतिवाद, टोला - प्रतिटोला, विधानसभा - प्रतिविधानसभा ही नाटक संपली असतील तर जरा जनतेचा विचार करा. टाळेबंदीमुळे जनता पिचली आहे. लोकल प्रवासाची मुभा द्यावी. मास्क लावून जनतेचं तोंड कायमच बंद करता येणार नाही", अशी खरमरीत टीका त्यांनी केली होती.

loading image