Raj Thackeray : "वेडात मराठे वीर दौडले चाळीस"; राज ठाकरेंची CM शिंदेंवर मिश्किल टिप्पणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray_Eknath Shinde

Raj Thackeray: "वेडात मराठे वीर दौडले चाळीस"; राज ठाकरेंची CM शिंदेंवर मिश्किल टिप्पणी

मुंबई : 'वेडात मराठे वीर दौडले सात' हे महाराष्ट्र गीत आपल्या सर्वांना माहितीच आहे. याच गीताचा आधार घेत 'वेडात मराठे वीर दौडले चाळीस' अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मिश्कील टिप्पणी केली आहे. (Raj Thackeray passed funny comment on CM Eknath Shinde in Film Programme at Mumbai)

हेही वाचा: अक्षय कुमारची मराठी सिनेसृष्टीत होणार ग्रँड एन्ट्री; शिवरायांची साकारणार भूमिका

राज्यातील राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे यांनी हे भाष्य केलं. याचं निमित्त होतं महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात दौडले सात' या सिनेमाचा शुभारंभ सोहळा. हा सोहळा बुधवारी मुंबईत शानदार कार्यक्रमात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यानिमित्त एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकाच मंचावर पहायला मिळाले. यापूर्वी ते दिवाळीत शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात एकत्र आले होते, यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील होते.

हेही वाचा: Cabinet Decision: परतीच्या पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; कसे असतील निकष?

राज ठाकरे म्हणाले, "'वेडात मराठे वीर दौडले चाळीस'चे प्रोड्युसर, डिरेक्टर आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत. पण सिनेमाच्या क्षेत्रात वेडात धावणारा कोणी असेल तर महेश मांजरेकर आहे. तो प्रत्येक वेळेला एक भव्य स्वप्न घेऊन येतो. वेडात मराठे वीर दौडले सात हा सिनेमा करायचाय ही बाब पाच वर्षांपूर्वीच मांजरेकरांनी मला सांगितली होती. त्यावेळी मी त्याला म्हटलं की हे भव्य प्रकरण आहे, मराठीत कसं होणार पण त्यांना चांगले प्रोड्युसर मिळाले. त्यानंतर मराठीतील आजपर्यंतचा मराठीतला सर्वात मोठा चित्रपट येत आहे"

हेही वाचा: Thackeray-Ambedkar Alliance: ठाकरे-आंबेडकर येणार एकत्र; राज्यात नव्या युतीचे संकेत

मराठी चित्रपट आज कात टाकतोय आणि पुढे जातोय. फिल्म ही गोष्ट समजणारे काही बोटावर मोजणारे लोक आपल्याकडे आहेत. त्यांपैकी महेश माजरेकर हे एक आहेत. ते भव्य चित्रपट बनवतील यामध्ये मला शंका नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी यावेळी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

ध्येयवेडेच इतिहास घडवतात - मुख्यमंत्री

ध्येयवेडेच इतिहास घडवतात. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या आगामी चित्रपटात ध्येय आणि ते गाठण्यासाठीचे वेडदेखील आहे. त्यामुळे हा चित्रपट सातासमुद्रापार जाईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.