esakal | "रेमडेसिवीर राज्यात आणण्याबद्दल भाजपने माझ्याशी चर्चा केली होती"

बोलून बातमी शोधा

Rajendra-Shingne-Devendra-Fadnavis
"रेमडेसिवीर राज्यात आणण्याबद्दल भाजपने माझ्याशी चर्चा केली होती"
sakal_logo
By
विराज भागवत

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना विषाणूवर परिणामकारक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यात तुटवडा असल्याचे चित्र आहे. अशातच शनिवारी रात्री ब्रूक्स फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्यावर रेमडेसिवीरचा साठा केल्याचा आरोप ठेवला. या प्रकरणी रात्री दोन वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही भाजप नेते स्वत: पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी या मालकाला ताब्यात घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी या प्रकरणात भाजपला दोष दिला आणि राज्यात रेमडेसिवीरची कमतरता असताना त्याची साठेबाजी करणाऱ्यांना भाजप पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. पण आज अखेर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी ठाकरे सरकारलाच घरचा आहेर दिला. भाजपने उपलब्ध करून दिलेला रेमडेसिवीरचा साठा हा राज्य सरकारसाठीच वापरात येणार होता असं स्पष्टीकरण खुद्द शिंगणे यांनीच दिले.

हेही वाचा: "लॉकडाउन संपू दे, मग देवेंद्र फडणवीसांना..."

"भाजपकडून राज्य सरकारसाठी रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे याबद्दलची कल्पना मला होती. रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी आणि भाजपचे नेतेमंडळी यांची माझ्याच घरी बैठक झाली होती. त्यांनी महाराष्ट्र सरकारला रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध करून देण्यास तयारी दाखवली होती आणि मी त्या गोष्टीवर सहमती दर्शवली होती", अशी माहिती राज्याचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी स्थानिक प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली.

हेही वाचा: अरे बापरे! महाराष्ट्रात ऑक्सिजनची मागणी १३० टक्क्यापेक्षा जास्त

रेमडेसिवीरची ६० हजार इंजेक्शन्सच्या भाजपकडून उपलब्ध करून दिली जाणार आहेत याची कल्पना मला होती. ही रेमडेसिवीर इंजेक्शन्स केवळ महाराष्ट्र सरकारसाठीच असल्याचेही मला माहिती होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं. रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा हा साठा कोणत्याही दुसऱ्या हेतुसाठी राज्यात आलेला नाही. भाजप नेत्यांनी साठा आणण्याआधीच याबद्दलची खात्री मला दिली होती, हेदेखील शिंगणे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: 'माजी मुख्यमंत्र्यांना रात्री दोन वाजता...' काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

दरम्यान, मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री ब्रूक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याचा पोलिसांना संशय होता. मालकाला ताब्यात घेतल्याचे समजताच रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्याला का ताब्यात घेतले? का चौकशी केली? याबद्दल त्यांनी पोलिसांकडून स्पष्टीकरण मागितले. त्यांनी आणलेला माल हा नियमानुसार असून त्याचा वापर राज्यातील गरजू जनतेसाठीच केला जात असल्याचं भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केलं. पण सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र हा काळाबाजार असल्याचा आरोप करत अशा काळाबाजार करणाऱ्यांना भाजप पाठीशी घालत असल्याची टीका केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. पण आता खुद्द मंत्री शिंगणे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.