'वर्क फ्रॉम होम'मध्येही कार्यालयाची आठवण; आयटी कर्मचाऱ्यांच्या सर्व्हेक्षणातील निरिक्षण

कृष्ण जोशी
Wednesday, 9 September 2020

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होमची संस्कृती कंपनी आणि कर्मचारी अशा दोघांच्या अंगवळणी पडत असली तरी, आयटी कर्मचाऱ्यांना ऑफिसचे वातावरण व ती कार्यपद्धती याची सतत आठवण येत राहते, असे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.

मुंबई : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होमची संस्कृती कंपनी आणि कर्मचारी अशा दोघांच्या अंगवळणी पडत असली तरी, आयटी कर्मचाऱ्यांना ऑफिसचे वातावरण व ती कार्यपद्धती याची सतत आठवण येत राहते, असे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.  
रिअल इस्टेट क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या नाईट फ्रँक इंडिया या संस्थेने नुकतेच देशातील 1600 आयटी कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले. हे कर्मचारी जवळपास सहा महिन्यांपासून वर्क फ्रॉम होम करीत आहेत. या नव्या कार्यसंस्कृतीचे फायदे व तोटेही झाल्याचे मत कर्मचाऱ्यांनी मांडल्याचे नाईट फ्रँक चे अध्यक्ष शिशीर बैजल यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसमोर समस्यांचा डोंगर; आयुक्तांना दिले निवेदन

सर्व्हेक्षणानूसार, देशातील नव्वद टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करतानाही कार्यालयाची सतत आठवण येते.  प्रवासाचा वेळ वाचला असे 60 टक्के कर्मचारी म्हणाले. प्रवासाचा, बाहेर जेवण्याचा व इतरही खर्च कमी झाला, असे 58 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले. आपले  छंद जोपासण्यास वेळ मिळाला, घराकडे लक्ष देता आले, कामाच्या वेळा आपल्या  सोयीनुसार ठरवता आल्या, असे फायदेही अनेकांनी सांगितले. तर, कार्यालयाच्या सामाजिक जीवनाची कमतरता 43 टक्के लोकांना जाणवली.
घरात एकाग्रता साधता येत नाही, असे 42 टक्के कर्मचाऱ्यांना वाटले. सहकाऱ्यांशी तसेच वरिष्ठांशी संपर्क साधण्यात अडचणी आल्या, कौटुंबिक जीवनात अडचणी आल्या, रुटीन सांभाळणे कठीण झाले, घरातून काम केल्याने काही खर्चही वाढले, संगणक नाही, वेगळी जागा नाही, इंटरनेटचा स्पीड, आदी अडचणीही आल्याचेही अनेकांनी सांगितले.

बेकायदा बांधकामप्रकरणी कंगनाला BMC नोटीस; चटई क्षेत्र नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा

मुंबईकरांचाही ऑफिसकडे कल 
ऑफिसची आठवण काढणाऱ्यांमधील सर्वात जास्त कर्मचारी दिल्लीतील (98 टक्के) आहेत. तर, मुंबईतील 94 टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसात जावेसे वाटते. पुण्यात हे प्रमाण 88 टक्के आहे. घरून काम केल्यामुळे उत्पादकता व आपली कामगिरी बिघडली, असे 30 टक्के लोकांनी सांगितले.

----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: remembering of the office even in Work from Home; IT staff survey observations