घुसखोरांची माहिती दिल्यास मनसे देणार 'साडेपाच हजार रुपये'! वाचा संपुर्ण बातमी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 March 2020

  • मनसेची घुसखोरांविरुद्ध नवी मोहीम 
  • माहिती देणाऱ्यास रुपये पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे बक्षीस 
     

मुंबई : मनसेच्या पहिल्या महामेळाव्यात अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात भूमिका जाहीर केली. त्यानंतर मनसैनिकांनी अनेक ठिकाणी घुसखोरांची धरपकड करण्यास सुरुवात केली. यानंतर मनसेने आता "घुसखोर कळवा, बक्षीस मिळवा' अशी हाक देत नवीन मोहीम सुरू केली आहे.

 मोठी बातमी! अजित पवारांनी 'सीएए-एनआरसी'वर सोडले मौन!

राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलत हिंदुत्वाची कास धरली आहे. यानंतर त्यांनी नवीन वाट चोखाळत नवीन मार्गावर वाटचाल सुरू केली आहे. मराठीचा मुद्दा काहीसा बाजूला सारत राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. यानंतर त्यांनी पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या घुसखोरांमुळे देशाच्या सुरक्षेला धोका असून मुंबईत घुसखोरांचे मोहल्ले च्या मोहल्ले उभे राहिले आहेत. या घुसखोरांना हाकलून लावा असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाणे पुणे नाशिक सह अनेक शहरांमध्ये घुसखोरांची धरपकड करणे सुरू केले. मात्र, मनसेच्या या मोहिमेला फारसं यश मिळालं नाही. काही ठिकाणी तर मनसेने पडदाफाश केलेले बांग्लादेशी हे भारतीय असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे काही दिवसानंतर ही मोहीम थंडावली. 

#BMCपालिकेचा धडाका : आठ दिवसांत ३५० कोटींची वसुली

आता घुसखोरांना शोधण्यासाठी मनसेने नवी मोहिम आखली आहे. "घुसखोर कळवा बक्षीस मिळवा' अशी नवी मोहीम मनसेनेने मुंबईत सुरू केली आहे. मनसेचे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील उपविभाग अध्यक्ष अखिल चित्रे यांनी ही मोहीम सुरु केली असून घुसखोरांना पकडण्यासाठी त्यांनी आता या मोहिमेच्या माध्यमातून थेट लोकांना साद घातली आहे. बॅनर, समाजमाध्यमांचा वापर करून ही पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. 

माहिती देणाऱ्याविषयी गुप्तता ठेवणार 
"बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढा'. या मोहिमेत समोर आलेल्या घुसखोरांच्या माहितीची पडताळणी करून हे बक्षीस देण्यात येणार आहे. शिवाय माहिती देणाऱ्याविषयी गुप्तता ठेवण्यात येणार आहे. घुसखोर असल्याचे स्पष्ट झाल्यास माहिती देणाऱ्यास रुपये पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. 
 

 

मुंबईतील अनेक मोहल्ल्यांमध्ये घुसखोर बांगलादेशी मुस्लिम वास्तव्यास आहेत.त्यांना हुडकुन काढणे गरजेचे आहे.कागदपत्रांसह त्यांची माहिती काढणे आवश्यक असून त्यासाठीच आम्ही ही मोहीम सुरू केली आहे.

अखिल चित्रे , उपविभाग अध्यक्ष , मनसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: report any illegal migrants and get rs 5555 reward says mns