"एक दोन दिवस राहू शकतो, पण घरात लहान मुलं आहेत, त्यांना दूध मिळाले नाही तर आम्ही घरात बसू शकत नाही"

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

"आम्ही काळजी घेत आहोत, तर पालिका प्रशासनानेही आमची काळजी घेत आम्हाला किमान आवश्यक सुविधा दिल्या पाहीजेत. एक किंवा दोन दिवस नागरिक काढू शकतात. परंतू घरात किराणा नसेल, लहान मुले आहेत त्यांना दूध मिळाले नाही तर नागरिक घरात बसू शकत नाहीत. "

ठाणे : डोंबिवलीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने काही विभाग सील केले. दरम्यान रहिवाशांना भाजीपाला, दूध तसेच अन्य जीवनावश्यक वस्तू महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येतील अशी ग्वाही पालिका आयुक्त सुर्यवंशी यांनी दिली होती. असे असले तरी गुरुवारी सील केलेल्या विभागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पालिका प्रशासनाने उपलब्ध न केल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 

संचारबंदीच्या सील केलेल्या विभागातील बहुसंख्य रहिवाशी खबरदारी घेत घरात बसून आहेत. परंतू त्यांच्यापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचत नसल्याने घरातील एका व्यक्तीला नाईलाजाने बाहेर पडावे लागत आहे. पालिका प्रशासन केवळ घोषणा करीत आहेत, आवश्यक त्या सुविधा देत नसल्याने या प्रभागात आणखी रुग्णांची संख्या वाढल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार पालिका प्रशासन असेल असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. 

Inside Story : डॉक्टरांना कोरोनापासून वाचवणाऱ्या PPE घ्या जाणून

डोंबिवली पूर्वेत म्हात्रे नगर परिसरातील एका लग्न समारंभारत तुर्की येथून आलेला तरुण सहभागी झाला. तो कोरोना बाधित असल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही त्याची लागण झाली असून कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिका प्रशासनाने प्रथम म्हात्रे नगर विभाग 28 मार्चला सील केला. परदेशातून आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजताच म्हात्रे नगर परिसराला लागून असलेले न्यु आयरे रोड, आयरे गाव परिसर सील करण्यात येणार असल्याचे बुधवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. या दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पालिका प्रशासनाकडून करण्यात येईल अशी सूचनाही प्रशासन व पोलिसांकडून विभागास देण्यात आली. आयरे गावात जाणारा मुख्य रस्ता १ एप्रिलला रात्री सील करण्यात आला. सील करण्यात आलेल्या विभागात वाहतुकीस पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. 

गुरुवारी सकाळी घरी दूध आले नसल्याने प्रभागातील नागरिक दूधासाठी सकाळी बाहेर पडल्याचे दिसून आले. प्रभाग सील करण्यात आल्याने रस्त्यावर काठ्या लावलेल्या ठिकाणी येऊन काही नागरिक माघारी फिरत होते. तर काहींनी मात्र त्या बांबूच्या खालून जाऊन पुढील दुकानांतून दूध आणण्याचा प्रयत्न केला. कोपर येथील झोपडपट्टी परिसरातील एका विक्रेत्याने घरात दूधाचा साठा करुन ठेवला असल्याने त्याने सकाळी दोन रुपये चढ्या दराने विक्री करुन आपली पोळी भाजून घेतली. रहिवाशांनीही पर्याय नसल्याने जास्तीचे पैसे मोजून एक ते दोन लीटर दूधाचा साठा घरात करुन ठेवणे पसंत केले. 

मोठी बातमी -  नवजात बाळासाठी हानिकारक आहे का कोरोनाबाधित आईचं स्तनपान?

आम्ही काळजी घेत आहोत, तर पालिका प्रशासनानेही आमची काळजी घेत आम्हाला किमान आवश्यक सुविधा दिल्या पाहीजेत. एक किंवा दोन दिवस नागरिक काढू शकतात. परंतू घरात किराणा नसेल, लहान मुले आहेत त्यांना दूध मिळाले नाही तर नागरिक घरात बसू शकत नाहीत. - किशोर म्हात्रे, रहिवासी

काही विक्रेत्यांनीही पहाटे दुचाकी सील केलेल्या भागाच्या इथे उभ्या करुन बाहेर पडून पिशव्यांतून दूध आणून ते आपल्या दूकानात विक्रीस नेले. सकाळच्या वेळी या रस्त्यावर पोलिस नसल्याने नागरिक बांबूंच्या खालून ये जा करीत होते.

गेले काही दिवस म्हात्रे नगर परिसर सील असल्याने भाजी विक्रेते बसत नाही, त्यात आता आयरे गावही सील केल्याने भाजी मिळण्याचे सर्वच मार्ग बंद झाले आहेत. किराणाचे दुकान सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत सुरु होते. परंतू घरात मिरची, कोथींबिर अशा आवश्यक वस्तू सतत लागतातच, त्या किराणाच्या दूकानात मिळत नाही असे नीता पाटील यांनी सांगितले.

सुखावणारी बातमी ! पाच दिवसांच्या नवजात बालकाची कोरोनावर मात

बालाजी गार्डन सोसायटीतील नागरिकांनी शिस्तीचे पालन करीत घरातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे. हे रहिवाशी पालिकेच्यावतीने भाजीपाला पाठविला जाईल याची वाट पहात आहेत. परंतू केवळ एक दिवस पालिकेच्या वतीने भाजीची गाडी पाठविण्यात आली, त्यावेळेसही उत्तम दर्जाची भाजी नसल्याने, दुसऱ्या दिवशी चांगली भाजी येईल हा विचार करत अनेकांनी भाजी न घेताच माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. परंतू नंतर एकदाही पालिकेची भाजीची गाडी आलेली नाही, आता तर दूधाची गाडीही बंद झाल्याने रहिवाशांचे हाल झाले आहेत असे रहिवाशांनी सांगितले. 

म्हात्रे नगर परिसरातील रहिवाशी गेल्या चार दिवसांपासून घरात बंद आहेत. या प्रभागातही अत्यावश्यक सुविधा पालिकेच्या वतीने पुरविल्या गेलेल्या नाहीत. केवळ घंटागाडी प्रभागात येत असून इतर कोणतीही सुविधा पुरविली जात नाही. नागरिक नाईलाजाने सकाळी लवकर किंवा रात्री बाहेर पडून वस्तूंची ने आण करीत आहेत. 

resident of sealed localities are asking to provide food and milk during corona crisis 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: resident of sealed localities are asking to provide food and milk during corona crisis