esakal | कडक निर्बंध: '७ ते ११ वेळेमुळे आणखी गर्दी वाढण्याची भीती'

बोलून बातमी शोधा

restrict timings for shops
कडक निर्बंध: '७ ते ११ वेळेमुळे आणखी गर्दी वाढण्याची भीती'
sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारनं कठोर निर्बंध लागू केले आहेत. आजपासून १ मेपर्यंत भाजीपाला, किराणा आणि दूध दुकानं सकाळी ७ ते ११ याच वेळेत सुरु राहणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्बंधामुळे किरकोळ विक्रेते आणि व्यापारी मात्र चिंतेत आहेत. विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलं आहे. सरकारनं दिलेल्या वेळेत अधिक गर्दी होण्याची भीती विक्रेते आणि व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. ज्यावेळी दिवसभर दुकानं सुरु असताना गर्दीचं प्रमाण काही प्रमाणात आटोक्यात होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आताच्या नियमानुसार होणारी गर्दी सांभाळताना पोलिसांनाही अडचण येऊ शकते.

दूध, किराणा आणि भाजीपाला घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागेल, अशी भीती नागरिकांना आहे. दरम्यान रात्री ८ वाजेपर्यंत होम डिलिव्हरीला जरी परवानगी देण्यात आली असली तरीही कमी किंमतीच्या ऑर्डर स्विकारल्या जाणार नसल्याचं दुकानदारांनी स्पष्ट केलं आहे. तीन डिलिव्हरी बॉयसोबत आम्ही फक्त १५०- २०० रुपयांच्या वर ऑर्डर पाठवतो. मात्र आता कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे होम डिलिव्हरी करणं अवघड झालं असून त्याचा आर्थिक व्यवहारावरही परिणाम होत आहे. माझ्या पाच कर्मचाऱ्यांपैकी दोन कामगार गावी गेले. उरलेले तीनमध्ये एक जण पुरवठा आणि अन्य दोन होम डिलिव्हरी आणि कॅश काऊंटर सांभाळत असल्याचं अंधेरी येथील किराणा मालक यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: ''कोणत्याही पक्षाला रेमडेसिवीर विकण्याचा अधिकार नाही''- राजेंद्र शिंगणे

आजपासून नवी नियमावली लागू

राज्य सरकारनं या नियमावलींचं अधिकृत पत्रक जाहीर केलं आहे. यानुसार, कुठली दुकानं मर्यादीत काळात सुरु राहतील आणि कुठल्या सेवा दिवसभर सुरु राहतील याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत काय खुलं राहणार?

किराणा दुकानं, भाजीपाला विक्री केंद्र, फळ विक्री केंद्र, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकानं, बेकरी, सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकानं (यामध्ये चिकन, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांचा समावेश), कृषी संबंधीच्या सेवा आणि शेतमालाची दुकानं, पाळीव प्राण्यांच्या खाद्यांची दुकानं, पावसाळ्यासंबंधी वस्तूंची दुकानं आणि संस्था या सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत खुली राहतील.

हेही वाचा: लॉकडाऊनचा फटका; रिक्षा, टॅक्सी चालकांना प्रवासी मिळेना

सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु असणाऱ्या सेवा

सध्याच्या संचारबंदीच्या काळात यापूर्वी काढलेल्या शासन आदेशानुसार ज्या घरपोच सेवांना परवानगी देण्यात आली आहे. त्याच सेवा आता नव्या आदेशानुसार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. स्थानिक प्रशासनाला गरजेनुसार यामध्ये बदल करण्याचे अधिकार असतील, असंही नव्या आदेशात म्हटलं आहे. दरम्यान, बाकी इतर सर्व सेवा आणि वस्तूंची दुकानं पूर्णतः बंद राहणार आहेत.

retailers and traders anxious restrict timings more crowds government decision