
तुलनेत सखल असलेल्या रेवस बंदराच्या समस्यांमध्ये भर पडली असून, येथील गाळाची समस्या वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणची बंदरजेट्टी ही उत्तरेला दोनशे मीटरपर्यंत पुढे वाढवावी. ज्यामुळे पाणी कमी असतानादेखील लहान-मोठ्या बोटी सहजपणे धक्क्यापर्यंत येऊ शकतील, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.
मुंबई : तुलनेत सखल असलेल्या रेवस बंदराच्या समस्यांमध्ये भर पडली असून, येथील गाळाची समस्या वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणची बंदरजेट्टी ही उत्तरेला दोनशे मीटरपर्यंत पुढे वाढवावी. ज्यामुळे पाणी कमी असतानादेखील लहान-मोठ्या बोटी सहजपणे धक्क्यापर्यंत येऊ शकतील, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.
अखिल भारतीय प्रवासी संघटनेतर्फे नुकतीच बंदर खात्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. रेवस बंदरात सध्या मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे पौर्णिमा-अमावास्येच्या आधी व नंतर येथे पाणी कमी झाले की, छोट्या तरसेवा आणि फेरीबोटीदेखील बंदराला लागण्याआधी मध्येच अडकतात. त्यामुळे प्रवाशांना दुसरी व्यवस्था होईपर्यंत तासन् तास ताटकळत रहावे लागते, असेही संघटनने आपल्या निवेदनात म्हटले आहे. बंदरजेट्टीची लांबी वाढवावी; तसेच त्यापूर्वी खात्यांतर्गत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या ड्रेजरमार्फत बंदरातील गाळ काढावा. ज्यामुळे पाणी खोल होऊन बोटी जेटीपर्यंत येऊ शकतील, असे संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सांगितले. यासंदर्भात राज्यमंत्र्यांनी मेरिटाईम बोर्डाला योग्य त्या सूचना दिल्या असल्याचेही ते म्हणाले.
रेवस बंदरातील गाळ काढणेही गरजेचे आहे. संघटनेतर्फे सरकारकडे या मागण्या वारंवार करण्यात आल्या आहेत; मात्र आता येथील बोटींची व प्रवाशांची संख्या तसेच वाहतूक वाढत असताना या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
- चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, अखिल भारतीय प्रवासी संघटना
---------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)