"झोलयुक्त शिवार आणि 'मी लाभार्थी' फेल, भाजपकडून पैसे वसूल करा"; सचिन सावंत

कृष्ण जोशी
Thursday, 15 October 2020

फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून राज्यात पाणीसाठा न वाढता फक्त काही कंत्राटदारांच्या पैशाचा साठा मात्र वाढला असल्याचा आरोप काँग्रेसने वारंवार केला होता

मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारची 'झोल'युक्त शिवार योजना तसेच त्यांनी केलेल्या 'मी लाभार्थी' या खोट्या जाहिराती फेल गेल्या आहेत. त्यामुळे या जाहिरातींवर उधळलेले शेकडो कोटी रुपये भाजप कडूनच वसूल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून राज्यात पाणीसाठा न वाढता फक्त काही कंत्राटदारांच्या पैशाचा साठा मात्र वाढला असल्याचा आरोप काँग्रेसने वारंवार केला होता व यातील भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. त्यावर नुकत्याच आलेल्या कॅगच्या अहवालातही शिक्कामोर्तब करत गंभीर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे काँग्रेस पक्ष स्वागत करीत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

महत्त्वाची बातमी : मुंबईतील मेट्रो सुरु करण्यास परवानगी, ग्रंथालयं देखील उद्यापासून खुली होणार; शाळांबाबत काय म्हटलंय परिपत्रकात, वाचा

जलयुक्त शिवार योजनेबदद्ल करण्यात आलेले सर्व दावे फडणवीस सरकार असतानाच पोकळ निघाले होते. या योजनेमुळे 16 हजार गावे दुष्काळमुक्त झाली आणि अजून 9 हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहेत असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पण आठच दिवसांत ही सर्व दुष्काळमुक्त गावे तत्कालीन सरकारला दुष्काळयुक्त म्हणून जाहीर करावी लागली होती, असे सावंत यांनी दाखवून दिले. 

तरीही फडणवीस सरकार जवळच्या ठेकेदारांना जगवण्यासाठी या योजनेचे गुणगान करत राहिले. ‘मी लाभार्थी’ या खोट्या जाहिरातींवर शेकडो कोटी रूपयांची उधळण करण्यात आली. ही योजनाच आता फेल गेली आहे व त्यावर राज्यातील जनतेच्या करोडो रुपयांची उधळण झाल्याने तो पैसा आता वसूल झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

यासंदर्भात सावंत म्हणाले की, सर्व उद्दिष्टांवर ही योजना सपशेल अपयशी ठरली आहे. काँग्रेसने 2015 पासूनच ही योजना भ्रष्टाचारग्रस्त आणि कंत्राटदारांसाठी कुरण बनल्याचे निदर्शनास आणून दिले होते. या योजनेवर 10 हजार कोटी रुपये खर्च करूनही टँकरची संख्या वाढतच राहिली. 2019 च्या मे महिन्यात राज्यात 7 हजारांपेक्षा जास्त टँकर सुरु होते. टँकरची ही विक्रमी संख्याच या योजनेचे अपयश दर्शवणारी आहे. 

महत्त्वाची बातमी : "ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का?" अमृता फडणवीसांना ठाकरी भाषेत तिखट उत्तर

या योजनेचे काम अशास्त्रीय पद्धतीने झाले तसेच जेसीबी यंत्राने फक्त खड्डे खोदण्याचे काम झाले आणि त्यात पाणी साठण्याऐवजी फक्त गाळ साठला. काँग्रेसने या योजनेतील फोलपणा दाखवत धोक्याची घंटा वाजवूनही तत्कालीन सरकारने  जाणिवपूर्वक काम सुरुच ठेवले व त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण ही केले नाही. आता चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही सावंत म्हणाले.

( संपादन - सुमित बागुल )

sachin sawant demands recovery of money used for mi labharthi campaign


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sachin sawant demands recovery of money used for mi labharthi campaign