esakal | मनसुखच्या हत्येच्या वेळी सुनील माने तिथेच होता; NIAचा दावा

बोलून बातमी शोधा

मनसुखच्या हत्येच्या वेळी सुनील माने तिथेच होता; NIAचा दावा
मनसुखच्या हत्येच्या वेळी सुनील माने तिथेच होता; NIAचा दावा
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात NIAने शुक्रवारी मुंबई पोलिस दलातील आणखी एका पोलिस अधिकाऱ्याला अटक केली. या प्रकरणात सर्वप्रथम सचिन वाझे आणि नंतर रियाझ काझी या दोन पोलिस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज NIAने पोलिस अधिकारी सुनील मानेला अटक केली. मनसुख हिरेनला हत्येच्या काही काळ आधी जो फोन आला होता, तो फोन तावडे नावाच्या पोलिस अधिकाऱ्याने केल्याची माहिती हिरेन यांच्या पत्नीने दिली होती. मात्र, तो फोन तावडे नावाच्या पोलिसाने केला नसून सुनील मानेनेच केला असल्याचा दावा NIA ने केला. तसेच, मनसुखच्या हत्येच्या वेळी माने स्वत: घटनास्थळी हजर असल्याची माहितीदेखील NIA ने कोर्टात दिली आहे, असंही सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: मनसुख हिरेन प्रकरणात WhatsApp कॉल ठरला महत्त्वाचा

सकाळी अटक केल्यानंतर सुनिल मानेला दुपारी २ च्या सुमारास NIAच्या स्पेशल कोर्टात हजर करण्यात आले. 'माने पहिल्या दिवसापासून तपासात सहकार्य करत असूनही NIA ने मानेला पहाटे अटक केल, ही बाब कायद्याच्या दृष्टीने चुकीची आहे. 48 तासाच्या चौकशीनंतर अटक करणं अयोग्य आहे. NIA कडे कुठलेही पुरावे नाहीत. मानेचा या गुन्ह्यात सहभाग नाही. फक्त तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर ही अटक केली जात आहे. त्यामुळे मानेला तातडीने जामीन मिळावा', असा युक्तीवाद मानेच्या वकिलांनी केला.

हेही वाचा: NIAचे नवे महानिरीक्षक मनसुख हिरेनच्या घरी

त्यावर NIA कडून वकिलांनी बाजू मांडताना काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले. 'मनसुखच्या हत्येच्या गुन्ह्यात मानेचा स्पष्ट सहभाग असल्याचे ATS तपासात समोर आले आहे. त्याचबरोबर काही तांत्रिक पुरावेही मानेविरोधात आहेत. म्हणूनच अटकेची कारवाई झाल्याचे NIA कडून सांगण्यात आले. त्यानंतर अखेर NIAच्या विशेष न्यायलयाने सुनिल मानेला २८ एप्रिलपर्यंत NIA कोठडी सुनावली.

हेही वाचा: सचिन वाझे प्रकरणात नवा ट्विस्ट; एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांची चौकशी

कोर्टाने मानेला कोठडी सुनावल्यानंतर पुन्हा एकदा मानेच्या वकिलांनी काही मागण्या केल्या. 'NIAने मानेला मानसिक त्रास देऊ नये. दररोज मेडिकल चेक अप केला जावा आणि त्याची एक कॉपी आम्हाला मिळावी. किंवा रिमांड कॉपी देण्यात यावी. तसेच मानेच्या चौकशीदरम्यान आतमध्ये थांबण्याची परवानगी द्यावी', अशा काही मागण्या मानेच्या वकिलांनी केल्या.

हेही वाचा: मनसुख हिरेनच्या हत्येच्या दिवशी सचिन वाझे चेंबूरला कोणाला भेटले?

या प्रकरणातील इतर दोन निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि रियाझ काझी यांनाही आज NIA कोर्टात हजर करण्यात आले. त्या दोघांचीही NIA कोठडी ५ मेपर्यंत वाढवण्यात आली. आजच्या सुनावणी दरम्यान, सचिन वाझेला त्याच्या घरातील सामान म्हणजेच टॉवेल, टूथ ब्रश आणि इतर काही गोष्टी वापरण्याची परवानगी मिळावी असा अर्ज वाझेच्या वकिलांनी कोर्टाकडे केला. परवानगी मागितली. दरम्यान, या प्रकरणात एकूण मुंबई पोलिस दलातील तीन अधिकारी आणि १ निलंबित अधिकारी यांना आतापर्यंत अटक झाली आहे.