रंगात रंगले... चित्रात दंगले

रंगात रंगले... चित्रात दंगले

पनवेल : पनवेलमधील विद्यार्थ्यांना रंग-रेषांच्या जादुई विश्‍वाची सफर घडविणारी ‘सकाळ बालकुमार चित्रकला स्पर्धा’ रविवारी (ता.१२) उत्साहात पार पडली. रविवारी सुट्टी असूनही स्पर्धा केंद्रावर चिमुकल्यांचा उत्साह, हातात रंगपेटी, पेन्सिल अन्‌ चित्रकलेचे साहित्य, मुलांनी मनात रेखाटलेले चित्र कागदावर उतरवण्यासाठी केलेली लगबग, पालकांच्या शुभेच्छांचा वर्षाव, असे चित्र पनवेल व उरणमधील ५ केंद्रांवर दिसून आले. 

पु. ना. गाडगीळ ॲण्ड सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेड ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’ चे रविवारी (ता.१२) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी नऊची वेळ, रविवारची सुटी असतानादेखील विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
पनवेलमध्ये खारघरमधील गोखले हायस्‍कुल, कळंबोलीतील सुधागड एज्‍युकशेन व नवीन पनवेल येथील के.आ. बांठिया, उरणमध्ये युईएस स्‍कुल व आरके फाऊंडेशच्या शाळेत या स्‍पर्धा पार पडल्‍या. 

बालमनांमध्ये दडलेल्या चित्रकलेला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी रंगात रंगून गेले होते. शालेय विद्यार्थ्यांच्या कल्पनांमधून साकारणाऱ्या रंग-रेषांना पाहून पालकही समाधान व्यक्‍त करत होते. 

स्पर्धेची विषयपत्रिका हाती पडताच मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारत चित्र काढण्यात दंग झालेले विद्यार्थी सर्वच केंद्रांत पाहायला मिळत होते. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही स्पर्धेसाठी तितकेच उत्साही असल्याने पालकांची मोठी गर्दी सर्वच केंद्रांबाहेर पाहायला मिळाली. राज्यस्तरीय ‘सकाळ’च्या चित्रकला स्पर्धेला सकाळी ९ वाजता सुरुवात झाली. चार गटांत झालेल्या या स्पर्धेला सर्वच मुलांनी चित्रे रेखाटण्यासाठी लागणारे रंग आपल्या सोबत आणले होते, तर चित्र काढण्यासाठी लागणारे कागद ‘सकाळ’तर्फे उपलब्ध करून देण्यात आला होता.

मुलांच्या कलागुणांना वाव

पनवेल-उरण तालुक्‍यातील ५ शाळांमध्ये झालेल्या या स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गेली अनेक वर्षे ‘सकाळ’तर्फे लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच दर्जेदार चित्रकार घडावेत यादृष्टीने राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात येत आहे. या वर्षीही या स्पर्धेस बालचित्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ही स्पर्धा यशस्वी केली. 

नवीन पनवेल येथे असलेल्या के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालयाच्या केंद्रात आयोजित चित्रकला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सकाळी ९ पासूनच विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. सकाळी ९ ते दुपारी १२.३० पर्यंत वेळ असलेल्या या स्पर्धेला यशस्वी करण्याकरीता के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बी. एस. माळी, चित्रकला शिक्षक माधव अभ्याकर, बापूराव महाजन, इंग्रजी माध्यमाच्या प्रमुख कल्पना ठक्कर तसेच कला शिक्षक ज्योती भांबरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com