सकाळ IMPACT: आच्छाड तपासणी नाका प्रकरणात चौकशीचे आदेश; परिवहन विभागात मोठी खळबळ...

toll naka
toll naka

मुंबई : देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने देशभरातील प्रवासी वाहतूक बंद आहे. मात्र, 1 जूनपासून गुजरात, राजस्थानातील खासगी प्रवासी वाहनांना छुप्या मार्गांने आच्छाड सीमा तपासणी नाक्यावरून महाराष्ट्रात सर्रास प्रवेश दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. त्यानंतर 'सकाळ'ने अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रकरण लावून धरल्यानंतर राज्य परिवहन आयुक्तांनी आता चौकशीचे आदेश दिले आहे. 

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आच्छाड सीमा तपासणी नाक्यावरून अवैध पद्धतीने प्रवासी वाहतूक केली जात होती. लॉकडाऊनच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता सीमा तपासणी नाक्यांवरील अधिकाऱ्यांनी या खासगी वाहतूकदारांना महाराष्ट्रात प्रवेश दिला होता. 'सकाळ'ने याप्रकरणात सखोल बातमीदारी केल्यानंतर राज्य परिवहन आयुक्तांनी याप्रकरणात चौकशीचे आदेश दिले. त्यासाठी नागपूर येखील प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. 25 जून रोजी चौकशीचे आदेश दिले असून येत्या 15 दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 

गुजरात, राजस्थान राज्यातील खासगी प्रवासी बसगाड्यांमधून अवैधरित्या हजारो मजुरांना महाराष्ट्रात सोडले आहे. गेल्या 1 जूनपासून हा प्रकार आच्छाड सीमा तपासणी नाक्यावर सुरू होता. प्रवासी वाहतुकीला परवाना नसताना, राज्याचा कर न भरता या गाड्या राज्यात सर्रास प्रवासी वाहतूक करत होत्या. बसगाड्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग नसून, प्रवाशांना दाटीवाटीने वाहून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सोडण्यात आले आहे. तर आवश्यक क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक सुद्धा करण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा सर्व प्रकार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 

सीसी टीव्ही फुटेजही तपासणार 

1 जूनपासून परराज्यातील वाहनांना गैरमार्गाने आच्छाड सीमा तपासणी नाक्यावरून सोडल्या जात असल्याचे प्रकरण उघड झाल्यानंतर आता याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. यामध्ये निःपक्ष तपासणी होणे गरजेचे असल्याने सीसी टीव्ही फुटेजही सुद्धा तपासण्यात येणार आहे. 
 

कोरोना संसर्ग वाढण्याची भीती
गुजरात, राजस्थान या राज्यातून खासगी बसेसद्वारे अवैध पद्धतीने हजारो मजुरांना महाराष्ट्रात आणण्यात आले आहे. ई-पास नसताना, महाराष्ट्राचा कर भरला नसताना आणि आरोग्य तपासणी केली नसतानाही या प्रवाशांना महाराष्ट्रात विविध ठिकाणी सोडण्यात आल्याने राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.
 

या दिशेने होणार चौकशी 

  • परराज्यातील खासगी प्रवासी वाहतुकीला परवाना नसतांना, टॅक्स न भरता, ई-पास नसतांना, खासगी प्रवासी वाहतूक होतात का ?
  • प्रवासी बसगाड्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना बसविले जाते का ?
  • परतीच्या प्रवासासाठी वाहनधारक ई-पास घेत नाहीत का अथवा कसे ?
  • सीमा तपासणी नाक्यावरील मोटार वाहन निरिक्षक व इतर अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात का ? आणि कसे ?
  • आच्छाड सीमा तपासणी नाका येथील संबंधित सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि नियंत्रण अधिकाऱ्यांनी आवश्यक ते नियंत्रण व पर्यवेक्षण केले आहे का ?
  • उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पालघर (वसई) यांनी सीमा तपासणी नाके व वायुवेग पथकावर आवश्यक असणारे नियंत्रण व पर्यंवेक्षण केले आहे का ?
  • उपप्रादेशिक परिवहन अधिकार, पालघर यांनी आच्छाड सीमा तपासणी नाक्याला भेट देऊन या अनुषंगाने आवश्यक सूचना दिल्या आहे का ?

आच्छाड सीमा तपासणी नाका येथून अवैधरित्या परराज्यातून महाराष्ट्रात खासगी प्रवासी वाहतूक होत असल्याचे आढळले. क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक, सोशल डिस्टन्सिंगचा अभाव, ई-पास नसलेली वाहनेही आढळून आलेली आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
- शेखर चन्ने, आयुक्त, राज्य परिवहन विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com