सहा महिन्यांनी मुंबईकर घेणार मोकळा श्वास, आजपासून संजय गांधी नॅशनल पार्क प्रभातफेरीसाठी खुलं

मिलिंद तांबे
Thursday, 15 October 2020

अखेर सहा महिन्यानंतर टाळेबंदीमुळे बंद करण्यात आलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 'मॉर्निंग वॉक'साठी येणा-या लोकांसाठी सुरू

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे गुदमरलेल्या मुंबईकरांना आता मोकळा श्वास घेता येणार आहे. अखेर सहा महिन्यानंतर टाळेबंदीमुळे बंद करण्यात आलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आज केवळ 'मॉर्निंग वॉक'साठी येणा-या लोकांसाठी सुरू होणार आहे. त्यानंतर प्रतिसाद आणि नियमावलीचे पालन कसे होते हे पाहून टप्प्या टप्यात हे उद्यान सुरू करण्याचा विचार केला जाईल असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक सुनिल लिमये यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात केवळ प्रभातफेरी म्हणजेच मॉर्निंग वॉकसाठी उद्यान सुरू करण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला आहे. सकाळी 5.30 ते सकाळी 7.30 वा या वेळेतच उद्यान मॉर्निंग वॉकसाठी खुलं. त्यानंतर उद्यानाबाहेर जाणे बंधनकारक आहे. प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी उद्यान बंद राहील. तसेच  सुचनांचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही उद्यान प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महत्त्वाची बातमी : "ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का?" अमृता फडणवीसांना ठाकरी भाषेत तिखट उत्तर

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 8 हजाराहून अधिक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. याची नोंद उद्यान प्रशासनाने ठेवली आहे. या सर्व लोकांची यादी तयार कऱण्यात आली असून त्यांचे तिन गृप बनवण्यात येणार आहेत. त्यात गट 'ए' मध्ये  'ए' ते 'आय' या अक्षराने सुरुवात होणाऱ्या नावांचे नागरिक, गट 'बी' मध्ये 'जे' ते 'क्यू' या अक्षराची सुरुवात होणारे नावे , गट 'सी' मध्ये 'आर' ते 'झेड' या अक्षराची सुरुवात होणारी नावे असलेले नागरिक प्रभात फेरीसाठी टप्याटप्याने बोलावण्यात येतील.

त्यासाठी प्रभात फेरी पासवर लिहिण्यात आलेल्या इंग्रजीमधील नावातील पहिले अक्षर विचारात घेण्यात येतील. त्यामुळे पास आणणे बंधनकारक असेल. प्रभात फेरी करीता येणाऱ्या व्यक्तिंकरीता त्यांची वाहने मुख्य प्रवेशद्वाराजवळ नव्याने तयार करण्यात आलेल्या पार्किंगमध्ये पार्क करण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र आदेश येईपर्यंत अतिरिक्त फी प्रभात फेरी पास धारकांकडून घेण्यात येणार नाही.

प्रभात फेरीसाठी 15 नोव्हेंबरपर्यंत जुन्या मुदत संपलेल्या पासच्या आधारे प्रवेश दिला जाईल. 15 नोव्हेंबरनंतर केवळ वैध मुदत पास आधारेच प्रवेश दिला जाईल. त्यापूर्वी पास संपलेल्या सर्वांनी पास नुतनिकरण करून घ्यावे. तसेच सर्व नियमांचे पालन करावे असे उद्यान प्रशासनाने सांगितले आहे. 

प्रभातफेरी करीता खालील दोन मार्ग निर्धारित: 

1) मुख्य प्रवेशव्दार -   त्रिमूर्ती रोड - तुमणीपाडा गेट व परत ( 5 किमी )

2 ) मुख्य प्रवेशव्दार - पोलिस चौकी - विभागीय कार्यालय - विश्रामगृह क्र 3 - वन्यप्राणी इस्पितळ -  बोटींग तिकीट काऊंटर -  नर्सरी  -  नदीकिनाऱ्याने बनविण्यात आलेल्या चालण्याच्या मार्गाने बाहेर  ( 4 किमी ) 

महत्त्वाची बातमी : मुंबईतील मेट्रो सुरु करण्यास परवानगी, ग्रंथालयं देखील उद्यापासून खुली होणार; शाळांबाबत काय म्हटलंय परिपत्रकात, वाचा

हे नियम पाळणे बंधनकारक:

  • योग्य मार्गानेच भ्रमंती करावी .
  • ग्रुप ऍक्टिव्हिटीसाठी एकत्र येवू नये, तसेच उद्यानामध्ये कुठेही बसू नये.
  • सध्या पुढील आदेश येईपर्यंत गर्भवती स्त्रिया, आजारी व्यक्ती, दहा वर्षाखालील मुले व 65 वर्षावरील व्यक्ती यांना उद्यानामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
  • प्रभात फेरीकरीता येताना प्रत्येक व्याक्तिंनी मास्क आणि सॅनिटायझर सोबत आणणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थीतीत मास्क शिवाय प्रवेश दिला जाणार नाही .

( संपादन - सुमित बागुल )

sanjay gandhi national park open for morning walk after six long months 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay gandhi national park open for morning walk after six long months