esakal | लॉकडाउन शेवटचा पर्याय? संजय राऊत म्हणतात...

बोलून बातमी शोधा

Sanjay-Raut
लॉकडाउन शेवटचा पर्याय? संजय राऊत म्हणतात...
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात संपूर्ण लॉकडाउन लावण्याची गरज आहे, असं मत गेले काही दिवस शिवसेना खासदार संजय राऊत व्यक्त करत होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित केलं आणि राज्यांनी लॉकडाउनकडे अंतिम पर्याय म्हणून पाहावं असं सांगितलं. या मुद्द्यावर आज संजय राऊत यांनी भाष्य केलं. "राज्यात लॉकडाउन लावणं हा शेवटचा पर्याय असावा असं पंतप्रधानांनी बोलणं ही त्यांची एक भूमिका असू शकते. पण त्याचसोबत त्यांनी हेदेखील स्पष्ट केलं आहे की प्रत्येक राज्यातील परिस्थिती काय आहे त्यानुसार निर्णय घेतले जावेत. त्याप्रमाणेच राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जर कोरोनाची साखळी तोडायची असेल तर त्यासाठी संपूर्ण लॉकडाउन हाच पर्याय आहे", असा पुनरूच्चार राऊत यांनी केला. "संपूर्ण महाराष्ट्रात लोक रेमडेसिवीर औषधासाठी भटकत आहेत. अशा वेळी गुजरातमध्ये मोफत रेमडीसीवर वाटप सुरू आहे. राजकीय पक्षाला रेमडेसिवीर कसं काय मिळतं, हा गंभीर प्रश्न आहे", या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

हेही वाचा: कारागृहात असणाऱ्या इंद्राणी मुखर्जीला कोरोनाची लागण

"महाराष्ट्राची रेमडेसिवीरची गरज ही 80 हजारांची आहे. महाराष्ट्राला अधिकाधिक आरोग्य सुविधा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. पण केंद्र महाराष्ट्राला लस कमी का देत आहे? केंद्रामध्ये झारीतील शुक्राचार्य कोण आहेत? हे शोधणं गरजेचं आहे. राज्यांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याचं काम केंद्र सरकारचं आहे. पण ते योग्य पद्धतीने केलं जात नाहीये. राज्यातील उच्च न्यायालयाला ऑक्सिजनबाबत हस्तक्षेप करायला लागतोय, ही बाब केंद्र सरकारने गांभीर्याने घ्यावी. सर्वात आधी केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या वाटचा जो निधी केंद्राकडे आहे, तो राज्याला परत द्यावा", असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा: Mumbai Covid 19: कोविडच्या दुसऱ्या लाटेत मुंबई बेहाल

"केंद्र सरकार एकूण किती ऑक्सिजन प्लँट तयार करत आहे हे सांगावं. देशभरात अनेक राज्यात टेस्टींग केलं जात नाही. त्यामुळे अनेक राज्यांचा रोजचा रूग्णवाढीचा आकडा कमी आहे. त्यातच कोरोनाचे नवेनवे स्ट्रेन सापडताना दिसत आहेत. हे कोरोनाचे स्ट्रेन खूपच गंभीर आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सध्या राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांची संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी आहे. त्यामुळे योग्य निर्णय होत आहे", असंही त्यांनी स्पष्ट केले.