संजय राऊतांनी डॉक्टरांची माफी मागावी नाही तर...

संजय राऊतांनी डॉक्टरांची माफी मागावी नाही तर...

मुंबईः  शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. राऊतांच्या वक्तव्यानंतर डॉक्टरांच्या संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. संजय राऊत यांनी डॉक्टरांची नाहीतर सामान्य जनतेची माफी मागावी अशी मागणी मध्यवर्ती मार्डकडून करण्यात आली आहे. 

एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात त्यांनी डॉक्टरांच्या विरोधात वक्तव्य करून त्यांची टर उडवली होती. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रानं ही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता केंद्रीय मार्ड संघटनेनंही जनेतची याबाबत जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.

अशा आशयाचे परिपत्रकच मार्ड संघटनेकडून काढण्यात आलं असून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले जाणार आहे. या परिपत्रकात आपली सुद्धा हीच अधिकृत भूमिका आहे असे ग्राह्य धरावे का? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

या परिपत्रकात लिहिलं की...

एकीकडे आपणच बोलायचे की डॉक्टर्स कोरोना योद्धा आहेत आणि दुसरीकडे आपल्याच सहकाऱ्यांनी अशी वल्गना करावी याचा नेमका अर्थ तरी तरुण डॉक्टरांनी काय घ्यावा? गेल्या अनेक महिन्यांपासून रात्रंदिवस जीवाची बाजी लावून डॉक्टर्स काम करत आहेत. अनेकांनी कित्येक महिने आपल्या आई-वडिलांचा चेहरा पाहिलेला नाही. अनेक जण मृत्यूच्या दाढेतून परत येऊन पुन्हा कामावर रुजू झाले आहे.  "डॉक्टरांना काय कळते" ते हे ऐकण्यासाठी का? असा प्रश्न मार्ड ने विचारला आहे. 

नाहीतर डॉक्टर्स रस्त्यावर उतरतील

संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरांचे खच्चीकरण करणारे आहे. खासदारांनी या वक्तव्याबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त करावी, असे न झाल्यास तरूण डॉक्टर्स याचा निषेध करण्यास रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असं मध्यवर्ती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल वाघ यांनी म्हटलं आहे. 

संजय राऊत यांचे विधान अतिशय बेजबाबदारपणाचे असून डॉक्टरांच्या केवळ कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे नसून कोरोनासारख्या भीषण महामारीच्या काळात मनोबलावर विपरीत परिणाम करणारे असल्याचं केईएम मार्डचे अध्यक्ष डॉ.दीपक मुंढे यांनी म्हटलं आहे. 

तसंच सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणून भोळीभाबडी जनता त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांचे आरोग्य बोगस डॉक्टरांच्या हातात देण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्यांच्या वक्तव्याचा मोठ्या प्रमाणावर गैरसमज निर्माण होत आहे. याची जाणीव ठेवून लोकांमधील संभ्रम आणि गैरसमज दूर व्हावे यासाठी संजय राऊत यांनी डॉक्टरांची माफी मागो न मागो परंतु, सर्वसामान्य जनतेची तात्काळ माफी मागून त्यांच्या मनात पेरलेले गैरसमज तात्काळ दूर करावे, असंही त्यांनी सांगितलं आहे. 

काय म्हणाले होते संजय राऊत 

एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात संजय राऊत यांना सध्याची राजकीय परिस्थिती तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना मुंबईतील साथीच्या रोगाची परिस्थिती हाताळण्याचा अऩुभव असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेने उद्धव ठाकरे यांचा सल्ला घ्यावा असेही म्हटले. यावेळी त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर टीका ही केली. त्यापुढे त्यांनी आपण कधीही डॉक्टरांकडून औषध घेत नाही,कंपाऊंडरकडून औषध घेतो, त्यांना जास्त अनुभव असतो असे वक्तव्य केले होते.

----------

(संपादनः पूजा विचारे)

sanjay raut controversial statement mard doctors writes letter cm uddhav thackeray

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com