esakal | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणतायत "संजय राऊत पवारांचा माणूस" अशी दिल्लीत ओळख
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणतायत "संजय राऊत पवारांचा माणूस" अशी दिल्लीत ओळख

"संजय राऊत पवारांचा माणूस", अशी दिल्लीत ओळख असल्याची टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणतायत "संजय राऊत पवारांचा माणूस" अशी दिल्लीत ओळख

sakal_logo
By
प्रशांत बारसिंग

मुंबई : "संजय राऊत पवारांचा माणूस", अशी दिल्लीत ओळख असल्याची टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजप प्रदेश कार्यालयात ते बोलत होते. नारायण राणे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून असल्याने त्यांचे प्रशासनावर नियंत्रण राहिलेले नाही. परिणामी राज्यातील कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. कोरोनाची स्थिती हाताळताना कोणाचाच पायपोस कोणाला नाही, अशी स्थिती आहे.

मुख्यमंत्री घरातून बाहेर पडतच नसल्याने त्यांना राज्यातील नेमकी स्थिती काय आहे, हे कळतच नाही. प्रशासनावर राज्यकर्त्यांचा वचक राहिलेला नसल्याने स्थिती भयानक बनली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत, सर्वाधिक मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. मात्र या राज्यातील रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. मुख्यमंत्री घरात बसले आहेत, मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यभर हिंडून परिस्थितीची पाहणी करत आहेत, असे राणे म्हणाले.

मोठी बातमी - मुंबईत आलेल्या केरळच्या डॉक्टरांची राज्य सरकारवर नाराजी; 'हे' आहे कारण..वाचा संपूर्ण बातमी..  

शरद पवार यांच्या मॅरेथॉन मुलाखतीबद्दलही भाष्य

यावेळी राणे यांनी शरद पवार यांच्या मॅरेथॉन मुलाखतीबद्दलही भाष्य केले. कोरोनामुळे राज्यातील गंभीर बनलेल्या स्थितीबाबत पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचे मार्गदर्शन घेण्याऐवजी भूतकाळातील राजकीय घडामोडींबाबत मुलाखत घेऊन मुलाखतकारांनी आपल्याला राज्यातील स्थितीचे भान नाही हेच दाखवून दिले आहे. राज्यातील गंभीर स्थितीवरून जनतेचे लक्ष वळविण्यासाठी ही मुलाखत घेतली असावी, असेही राणे म्हणाले. यावेळी त्यांनी सामना मधून शरद पवार यांच्यावर झालेल्या टीकेचे दाखलेही दिले. ज्या पवारांवर एवढी टीका केली त्याच पवारांची मॅरेथॉन मुलाखत सामनाला प्रसिद्ध करावी लागते आहे, यातच सारे आले, असे राणे यांनी नमूद केले.

मोठी बातमी - लाॅकडाऊनमध्येही तब्बल 'इतक्या' गंभीर नाॅन कोविड रुग्णांवर झाली शस्त्रक्रिया; वाचा सविस्तर बातमी.. 

वादळग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नाही 

कोकणात चक्रीवादळ होऊन महिना उलटला तरी वादळग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नसल्याबद्दल राणे यांनी आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. मराठा आरक्षणाबाबत शासनाची बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चांगले वकील नेमण्याकडे लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. 

( संकलन - सुमित बागुल )

sanjay raut is sharad pawars man says bjp leader narayan rane during is press conference