सापे-वामनेचे फलाट कमी उंचीमुळे नागरिकांचा विरोध

महाड : सापे-वामने स्थानकावर विरोधासाठी जमलेले ग्रामस्थ.
महाड : सापे-वामने स्थानकावर विरोधासाठी जमलेले ग्रामस्थ.

महाड (बातमीदार) : महाड तालुक्‍यातील सापे-वामने या कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकात दुपदरीकरणाचे स्थानक क्राँसिंगचे काम जोमाने सुरू आहे. यामुळे या रेल्वेस्थानकांमध्ये आणि फलाटांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामुळे भविष्यात प्रवाशांना धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी नव्या फलाटांची उंची वाढवून जुन्या फलाटांप्रमाणे ठेवावी, अशी मागणी या परिसरातील जवळपास ३२ गावातील नागरिकांनी केली आहे. १५ डिसेंबरला या नागरिकांनी स्थानकात जमून याला विरोध केला. कोकण रेल्वे प्रशासनाने मागणी मान्य न केल्यास नवीन स्थानकाचे काम बंद पाडण्याचा इशारा कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समितीने दिला आहे.

कोकण रेल्वे मार्गाचे सध्या दुपदरीकरण सुरू आहे. या कामामध्ये काही रेल्वेस्थानकांमध्ये व फलाटांमध्ये बदल करण्यात आले आहेत. कोकणात सावर्डे, अंजनी, मिरजान, कडवई, वेदवली, आरवली, विन्हेरे, राजापूर, मुर्डेश्वर या रेल्वे फलाटांची साधारण उंची २ फूट ठेवण्यात आली आहे. मात्र, या उंचीमुळे रेल्वेमध्ये चढताना प्रवाशांना त्रास होणार आहे; शिवाय वयोवृद्ध नागरिकांनाही चढणे शक्‍य होणार नाही. यामुळे महाड तालुक्‍यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समितीने सापे-वामने रेल्वेस्थानक व फलाटांची उंची वाढवावी, अशी मागणी केली आहे. यासाठी शनिवारी सकाळी समितीचे पदाधिकारी आणि नागरिकांनी या ठिकाणी कोकण रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

कोकण रेल्वेचे सहायक अभियंता के. एन. बिद्रे यांनी आपण याबाबत निर्णय घेऊ शकत नाही; परंतु काम पूर्ण करावे लागणार असल्याचे सांगितल्याने नागरिक संतप्त झाले. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समितीने कोकण रेल्वेच्या कोकण भवन कार्यालयात यापूर्वीच या रेल्वे स्थानकाची उंची दोन फुटांनी वाढवावी आणि गेट नंबर १७ जवळ प्रवासी उड्डाणपूल तयार करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. 

या वेळी कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समितीमधील अध्यक्ष मन्सूर देशमुख, वामने सरपंच प्रवीण साळवी, मुख्तार देशमुख, खुटील सरपंच राजेंद्र सुकुम, अय्युब देशमुख, सुनील जाधव; तसेच गोठे, सव, मुठवली, चोचींदे, आदे, नरवन, खुटील, भेलोशी, आंबिवली, नडगाव, सापे, वामने, रावढळ, कोसबी, अप्पर तुडील, लोअर तुडील, होडबेकोंड, आंबेवाडी, कुंबळे, जुई, रोहन, बेबलघर, ओवळे,  वलंग, चिंभावे, वराठी, गोमेंडी, तेलंगे आदिस्ते, वलंग, खैरांडेवाडी, खैरे या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. 
या भागातील प्रवाशांना रेल्वे प्रवासाचा फायदा मिळत नसल्याने २००५ ला कोकण रेल्वेस्थानकाच्या मार्गदर्शनाखाली या भागातील नागरिकांनी श्रमदानातून हे स्थानक बांधले. नव्या स्थानकाच्या कामामुळे हे स्थानक तोडले जाणार आहे.

सापे-वामने रेल्वेस्थानकांची उंची कमी करण्यात आली आहे. यामुळे रेल्वेमध्ये चढताना वयोवृद्ध प्रवाशांना त्रास होणार आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येथील काम बंद पाडले जाईल.
- मन्सूर देशमुख, अध्यक्ष, कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समिती

या स्थानकात केवळ चार गाड्या थांबतात. प्रवासी संख्याही फारशी नाही. त्यामुळे सर्वच ठिकाणी हे रचनात्मक बदल झाले आहेत. हा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जात असल्याने प्रवाशांची मागणी वरिष्ठ पातळीवर पाठवून दिली आहे. 
- के. एन. बिद्रे, सहायक अभियंता, कोकण रेल्वे

कोकण रेल्वे प्रशासनाकडे याबाबत यापूर्वी पत्रव्यवहार केलेला आहे; परंतु याकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही. त्यामुळे नागरिकांना हे आंदोलनात्मक पाऊल उचलावे लागले आहे.
- प्रवीण साळवी, सरपंच, वामने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com