
Latest Maharashtra News: ठाणे नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, ठाणे महापालिकेचे प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान (वय ८५) यांचे रविवारी (ता. २९) दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात मुलगा कमलेश प्रधान, सून डॉ. मानसी प्रधान, मुलगी, जावई, दोन नाती असा परिवार आहे.
त्यांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूने राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी (ता. ३०) सकाळी १०:०० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघेल. ठाण्यातील प्रमुख नेत्यांपैकी ते एक होते. शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. आर्थिक समस्येमुळे महाविद्यालयांमध्ये पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या विद्यार्थ्यांकरिता त्यांनी ठाण्यात ज्ञानसाधना महाविद्यालय सुरू केले.