उद्योजकांची व्यथा, म्हणतायत येत्या काळात उद्योग व्यवसाय चालवणे कठीण...

उद्योजकांची व्यथा, म्हणतायत येत्या काळात उद्योग व्यवसाय चालवणे कठीण...

मुंबई : सध्या कोरोना आणि त्यानंतरच्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर रडतखडत का होईना पण उद्योग-व्यवसाय सुरु राहण्याची जी आशा होती, ती आता स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची परवानगी सरकारने दिल्याने धुळीला मिळाल्याचे मत अनेक उद्योजक-व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. मुंबई, बदलापूर, डोंबिवली इतकेच नव्हे तर इस्लामपूर आदी सर्व ठिकाणचे बिल्डर, कारखानदार यांच्यात या बाबतीत एकमत आहे. विशेषतः अंगमेहनतीची कामे करण्यात उत्तर भारतीय, बंगाली कामगार थकत नाहीत. पण स्थानिक भूमिपुत्र ही कामे फार अंगाला लावून घेत नाहीत, अशीही प्रतिक्रिया व्यक्त झाली.

बांधकामांवर वाईट परिणाम

साधारण 21 मार्च पासून शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी कामे थांबविलीच आहेत. जे कामगार शहरात आहेत, त्यांनाही कधी एकदा गावी जातो असे झाले आहे. आम्ही या कामगारांना जेवण, मास्क, सॅनिटायझर आदी सर्व सोयी दिल्या आहेत, पण तरी ते कामावर यायला तयार नाहीत. लॉकडाऊन उठल्यावर या कामगारांच्या साह्याने कामे सुरु करण्याचा विचार होता, मात्र अनिश्चिचतेमुळे सर्वजण गावी जाण्याच्या तयारीत आहेत. आता आहेत ते कामगारही निघून गेले तर लॉकडाऊन उठल्यानंतरही कामाचा वेग अत्यंत मंद राहील. त्यामुळे प्रकल्पांचा कालावधीही वाढेल, खर्च वाढेल तसेच त्याकारणाने अनेक बांधकाम व्यावसायिकांना दंडही भरावा लागेल. गावी गेलेले कामगार लौकर परत येण्याची चिन्हे नसल्याने लॉकडाऊन नंतर कामगारांचा मोठा तुटवडा भासेल, अशी भीती रुणवाल ग्रूपचे व्यवस्थापकीय संचालक संदीप रुणवाल यांनी व्यक्त केली.

अंगमेहनतीसाठी पुढे

इस्लामपूरच्या सोना केमिकल्स चे सर्जेराव यादव यांनीदेखील कामगारांच्या स्थलांतरामुळे कामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली. यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांवर वाईट परिणाम होईल, सफाई कामगार, हमाल या कामांसाठी मजूर मिळाले नाहीत तर कामे होणारच नाहीत. म्हणजे उद्योगधंदा सुरु ठेवला तरी मनुष्यबळाअभावी तो चालवताच येणार नाही. शेजारच्या शहरातील कापड उद्योगात बारा-बारा तास काम करणारे महाराष्ट्राबाहेरचे मजूर मी पाहिले आहेत. माझ्या फॅक्ट्रीतही साधारण वीस च्या आसपास उत्तर भारतीय कामगार होते. ते निघून गेल्यानंतर सुदैवाने मला पंधरा-सोळा बंगाली कामगार मिळाले. त्यांची सगळी व्यवस्था आम्ही केली आहे. परराज्यातले कामगार अंगमेहनतीला मागेपुढे पहात नाहीत. उलट ट्रकवर दोन टन माल चढवायचा असेल तर त्यात मराठी मुले तग धरत नाहीत, असेही यादव यांनी सकाळ ला सांगितले. 

आशा संपुष्टात येईल

परराज्यातले कामगार निघून गेले तर उद्योग सुरु होण्याची जी काही थोडीफार आशा होती ती संपुष्टात येईल, असे इंडियन चेंबर ऑफ इंटरनॅशनल बिझनेस चे अध्यक्ष मनप्रीतसिंह नागी यांनी सकाळ ला सांगितले. नागी यांनी रबर-प्लास्टिक उत्पादन करणारी फॅक्ट्री असून त्यांच्याकडील 32 पैकी 15 कामगार स्थलांतरित आहेत. त्यांच्या रहाण्या-खाण्याची सारी व्यवस्था मी केली आहे, तरीही त्यांना गावी जायचे आहे. एरवीही ते मार्च महिन्यात शेतीच्या कामासाठी एकदोन महिने गावी जातातच, मात्र यावेळी त्यांना जाता न आल्याने त्यांचे दोन्हीकडे नुकसान झाले आहे. एरवीही मुंबई महानगर पट्ट्यातील उद्योगांमध्ये साधारण निम्मे कामगार स्थलांतरितच असतात. सध्या कारखाने सुरु करण्यासाठी सरकारने घातलेल्या कठोर अटी शिथील करण्याचे निवेदन आम्ही दिले आहे. ते मान्य झाले व कामगार निघून गेले तर त्याचा काहीच फायदा होणार नाही, असेही ते म्हणाले. 

नव्याला शिकवू की कारखाना चालवू

शिकवून तयार केलेले हे कामगार निघून गेले तर उत्पादन होणारच नाही. नवा कामगार शोधा, त्याला शिकवा हे सध्याच्या स्थितीत कठीण आहे, असे बदलापूरच्या के. अजय रेमेडीज प्रा. लि. चे अजय साबू यांनी सकाळ ला सांगितले. घातक रसायने हाताळण्यापूर्वी कामगारांना प्रशिक्षण देणे अत्यावश्यक असते. अशा प्रशिक्षित कामगाराऐवजी आता नवा कामगार मिळाला तरी पुन्हा त्याला शिकविण्यासाठी सुपरवायझरचा वेळ वाया घालवावा लागेल, मग मी उत्पादन कसे करू, असा प्रश्नही त्यांनी केला. मुंबई-पुणे-एमएमआर पट्ट्यात उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र येथून तसेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनही आठ-दहा महिने कामासाठी कामगार येतात, त्यांचे कुटुंब गावी असते. येथील कंपन्यांमध्ये पन्नास ते साठ टक्के स्थलांतरित कामगार असतात असेही साबू म्हणाले.

बांधकाम प्रकल्पांना उशीर

बांधकाम प्रकल्पांवर काम करणारे जे कामगार मुंबईतच आहेत, त्यांची बांधकाम व्यवसायिकांमार्फत काळजी घेतली जात आहे. आता त्यांनाही त्यांच्या गावी जाण्यास परवानगी दिल्याने स्थलांतर वाढेल. मात्र आता हे कामगार लवकर परत येण्याची शक्यता नाही. ते थेट पावसाळ्यानंतर परत येतील. त्यामुळे लॉकडाऊन नंतर जेव्हा बांधकामे सुरू होतील तेव्हा कामगारांचा तुटवडा भासेल. त्यामुळे बांधकामे पूर्ण करण्याची मुदत सहा महिने लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. -  अशोक मोहनानी, अध्यक्ष, एकता वर्ल्ड, उपाध्यक्ष नरेडको.

see what small an medium business owners are saying about business after lockdown

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com