esakal | "काळाबाजार करणाऱ्यांना वाचवण्याचा धंदा भाजपने सुरू केलाय"

बोलून बातमी शोधा

Nawab Malik
"काळाबाजार करणाऱ्यांना वाचवण्याचा धंदा भाजपने सुरू केलाय"
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण पेटलंय. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर काही आरोप केले. राज्याला आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा मिळू नयेत अशा पद्धतीने केंद्र अडवणूक करतंय असं ते म्हणाले. त्यानंतर, मलिक यांच्या जावयाला अटक झाल्याने ते केंद्रावर टीका करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्याशिवाय, पंतप्रधान मोदींवर केलेले आरोप तथ्यहीन असल्याचं सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी राज्यपालांना केली. या साऱ्या प्रकरणांवर आज मलिक यांनी पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली.

हेही वाचा: "लॉकडाउन संपू दे, मग देवेंद्र फडणवीसांना..."

"औषधांचा साठा करणाऱ्या मंडळींवर कारवाई झाली पाहिजे. यावरून राजकारण करण्याची आमची अजिबात इच्छा नाही. हे सगळे विषय समोर आणत असताना ऑक्सिजनचा तुटवडा कसा कमी होईल आणि रेमडेसिवीर लोकांपर्यंत कसं पोहोचेल याकडे आम्ही लक्ष पुरवत आहोत. पण काळाबाजार करणाऱ्यांना वाचवण्याचा धंदा भाजपने सुरू केला आहे", अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. "जे लोक माझा राजीनामा मागत आहेत आणि राज्यपालांकडे जात आहेत, त्यांना मी विचारू इच्छितो की मोदींविरोधात बोलल्यावर मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचा मोदी नावाचा कायदा आला आहे का? असं असेल तर तसं मला सांगा कारण मला बोलण्याचा अधिकार आहे आणि मी बोलणारच", असं त्यांनी ठणकावलं.

हेही वाचा: ३० एप्रिलपर्यंत देशात कडक लॉकडाउन?

"या देशात कोरोनाचे आकडे वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर रेमडेसिवीर मिळत नाही असे चित्र निर्माण झाले. त्याच काळात भाजपाच्या सुरत येथील कार्यालयात मोफत रेमडेसिवीर वाटप करण्यात येत असल्याचा प्रकार घडला. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी रेमडेसिवीर वाटप करण्यास किंवा साठा करण्यास परवानगी दिली नसल्याचा स्पष्ट खुलासा केला. त्या दिवसापासून भाजपचे काही नेते ५० हजार रेमडेसिवीर आणून देऊ असा दावा करत होते. भाजपच्या माध्यमातून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रेमडेसिवीरचा साठा त्यांच्या गोडाऊनमध्ये उपलब्ध झाला होता", असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

हेही वाचा: तन्मय फडणवीस मुद्द्यावरून अमृता फडणवीस मैदानात; म्हणाल्या...

"ब्रुक कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री वकिलपत्र घेऊन गेले होते. त्यानंतर माझ्यावर आरोप करण्यास सुरुवात झाली. मी सांगू इच्छितो, माझ्या जावयाचा विषय समोर आणला जात आहे. जावयाला अटक झाल्यामुळे नवाब मलिक केंद्राच्या विरोधात आणि अमित शहा यांच्या विरोधात बोलत आहेत. परंतु काही दिवसांपूर्वी मी स्पष्ट सांगितले होते की, कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही. जो काही निर्णय न्यायालयात होईल तो होईल. जे सत्य आणि असत्य आहे ते बाहेर येईलच", असेही नवाब मलिक म्हणाले.